नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील आरोपींकडून फाशीची शिक्षा पुढे ढकलली जावी किंवा टळावील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. पण कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेश सिंग, पवन गुप्ता , विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग अशी आरोपींची नावं आहेत. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांना आज, शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात येणार आहे.
निर्भयाची आई काय म्हणाली?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे की, “निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी मिळणार आहे. त्यामुळे मला शांती मिळेल.”तसेचं सात वर्षांनी माझ्या मुलीच्या आत्म्यास शांती मिळेल.
दरम्यान, तिहार तुरुंगात ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे. त्या ठिकाणाची गुरुवारी पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली. यावेळी पवन जल्लादही उपस्थित होते. पवन जल्लाद हेच चौघांना फाशी देणार आहेत. याआधी तीन वेळा या चौघांची फाशीची शिक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. या चौघांनीही राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या फेरविचार आणि न्यायसुधार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळल्या आहेत.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.