Shraddha Murder Case:  संपूर्ण देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या (Shraddha Murder Case) तपासात अनेक गोष्टी समोर येत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून पोलिसांनी कबुलीनाम्याला शून्य किंमत देत पुढचे पुरावे गोळा केले पाहिजेत, असा सल्ला माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी दिला आहे. या प्रकरणाला धार्मिक वळण देणाऱ्यांनाही त्यांनी खडसावले आहे. 


माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. मीरा बोरवणकर यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना सांगितले की, आरोपीच्या कबुली जबाबावर अवलंबून राहणे ही पोलिसांची मोठी चूक ठरू शकते. पोलिसांनी या कबुलीनाम्याला शून्य किंमत देत पुढील पुरावे गोळा केले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. सहा महिन्यानंतर गुन्हा कोर्टात सिद्ध करणे किती आव्हानात्मक असेल हे सांगताना त्यांनी म्हटले की, सहा महिन्यांपूर्वी झालेली हत्या सिद्ध करणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक काम आहे. पण, सध्या डीएनए आणि इतर तंत्रज्ञानामुळे तपासात आणि गुन्हा सिद्ध करण्यास मदत होऊ शकते. पोलिसांना पहिल्यांदा त्यांना आढळलेले शरिराचे तुकडे हे श्रद्धाचेच असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.


पोलिसांनी पुरावे जमा करावे


गुन्हा करण्यासाठी आरोपीने जे कारण सांगितले आहे, त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही. पोलिसांना इतर काही परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावे लागतील असेही मीरा बोरवणकर यांनी सांगितले. रक्ताचे नमुने, सीसीटीव्ही फूटेज, प्रत्यक्ष साक्षीदार आदी बाबीदेखील महत्त्वाचे ठरणार असल्याचे मीरा बोरवणकर यांनी सांगितले. 


श्रद्धाला आधार मिळाला असता तर...


श्रद्धाचे आंतरधर्मीय संबंध असल्याने तिचे वडील  नाराज होते, अशी माहिती आहे. या नात्यात शोषण सुरू आहे, हे तिला कळत होते. ती यामधून बाहेर पडू शकली नाही. श्रद्धा मुंबईतून दिल्लीला आली होती. त्यामुळे मित्रमैत्रिणींचा आधार मिळाला नाही. मुलांनी पालकांशी बोलावे आणि पालकांनी मुलांशी सातत्याने चर्चा केली पाहिजे. कायम संवाद ठेवला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. श्रद्धाला जर कुटुंबाचा मानसिक आधार मिळाला असता तर आजचे चित्र वेगळे असते असेही त्यांनी म्हटले. 


धार्मिक वळण देऊ नका


कोणत्याही गुन्ह्याला राजकीय आणि धार्मिक वळण देणे चुकीचं असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. गुन्हेगाराला अशा पद्धतीचे लेबलिंग करता येत नाही. गुन्ह्याकडे केवळ गुन्हा म्हणून पाहिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
 
फाशीची शिक्षा द्यावी


मीरा बोरवणकर यांनी सांगितले की, आरोपीला शिक्षा देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होतील. मी एरवी फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नसते. पण, हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. त्यामुळे गुन्हेगाराला फाशी देण्यात यावी अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केले. 


पाहा व्हिडिओ: Meera Borwankar on Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात कोणती आव्हानं?