नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन झालं. आज (16 एप्रिल) पहाटे चारच्या सुमारास त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. आपल्या कारकीर्दीत रणजीत सिन्हा यांनी सीबीआय संचालक, आयटीबीपी महासंचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.
रणजीत सिंह 1974 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) चे महासंचालक पदावर कार्यरत होते.
रणजीत सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. सीबीआयचे प्रमुख असताना कोळसा घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.
22 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख बनवण्यात आलं होतं. रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्त्व तसंच पाटणा आणि दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदावर काम केलं होतं.