Sushil Kumar Modi Passes Away: बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत त्यांचा लढा सुरु होता. सुशीलकुमार मोदी आजारपणामुळे लोकसभा प्रचारावेळी उपस्थित नव्हते. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. 


बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबाबत माहिती दिली. सुशील कुमार यांच्या निधनामुळं बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजयकुमार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "भाजपचे वरिष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आपल्यात राहिले नाहीत. संपूर्ण भाजप परिवारासह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे. आपल्या संघटन कौशल्यासह प्रशासकीय समज आणि सामाजिक राजकीय विषयांवर आपल्या सखोल माहितीसाठी ते कायम लक्षात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देओ तसेच या शोकप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो"




 
सुशील मोदी, नीतीश कुमार आणि लालू प्रसाद  यादव यांचा जेपी आंदोलन महत्वाचा सहभाग होता. सुशीलकुमार मोदी पहिल्यापासूनच आरएसएससोबत जोडले गेले होते. 1971 मध्ये सुशीलकुमार मोदी यांनी  विद्यार्थी राजकारणातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर युवा नेते म्हणून त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले. 1990 मध्ये सुशील यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी होऊन ते आमदार झाले. त्यानंतर बिहारच्या राजकारणात त्यांचं वजन वाढत गेले.  


2004 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार मोदी भाजपच्या तिकिटावर भागलपूरमधून खासदार झाले. 2005 मध्ये त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. तेव्हापासून ते विधान परिषदेचे सदस्य होते. सुशीलकुमार मोदी 2005 ते 2013 आणि 2017 ते 2020 पर्यंत बिहारचे अर्थमंत्री होते.