नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.


कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार
उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या असलेल्या शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढं आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेलं मिग-21 हे जगातील दुसरं सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेलं विमान आहे.


लवकरच राफेल उडवणार शिवांगी सिंह
बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅडमधील आहे, ज्याचं कमिशनिंग 2017 झालं. भारतील हवाई दलाच 10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमानं उडवण्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केलं होतं. लवकरच त्या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणार आहेत.


फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच 10 सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती. ही विमानं हवाई दलाच्या 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनचा भाग बनली.


चीनसोबत तणाव असताना लडाखमध्ये राफेल तैनात
चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यानच भारतीय हवाई दलाने राफेल विमानं एलएसीवर तैनात केली आहेत. लेह-लडाखवर राफेल कॉम्बेट एअर पेट्रोलिंग करताना दिसतात. चीनजवळच्या एलएसीवर भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं दिवस-रात्र एअर कॉम्बेट पेट्रोलिंग करत आहेत.


भारताने फ्रान्सस‌ोबत 36 राफेल लढाऊ विमानांचा करार केला होता. त्यापैकी पाच विमानांची पहिली बॅच भारतात पोहोचली असून हवाई दलाच्या अंबालामधील गोल्डन ऐरो स्क्वॉड्रनमध्ये सामील झाली आहेत. आणखी पाच विमानं पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहेत.