बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला जनतेने साफ नाकारलं. त्यानंतर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर फटाके फोडण्यात आले.

किरण ठाकूर घरात नसल्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे, मात्र त्यांच्या घरावर कोणी फटाके फोडून टाकले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

बेळगावात मराठी जनांमध्ये पडलेली फूट महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुळावर उठली. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये  महाराष्ट्र एकीकरण समितीचा सुपडासाफ झाला. त्यांना एकही जागा मिळवण्यात यश आलेलं नाही.

'महाराष्ट्र एकीकरण समिती' किरण ठाकूर आणि दीपक दळवी यांच्या दोन गटांमध्ये विभागली गेल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित मानला जात होता.

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 76 टक्के मतदान पार पडलं होतं. मात्र 18 पैकी एकाही जागेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आला नाही.