नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जणांना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


आग लागलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलचा वापर सध्या कोविड केअर सेंटर म्हणून करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये 30 रुग्ण आणि 10 वैद्यकीय कर्मचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.


कोरोना सेंटरला आगा लागल्याची ही या आठवड्यातील देशातील दुसरी घटना आहे. यापूर्वी गुजरातमधील रुग्णालयातही आग लागली होती. 6 ऑगस्ट रोजी अहमदाबादच्या कोरोना रुग्णालयात भीषण आग लागली आणि त्यामध्ये 8 रुग्णांचा मृत्यू झाला.





दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत ऐकून धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य राबवण्याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.