रांची (झारखंड) : जावईबापू सुधरतील, सासू, सासरा शांत होईल, मुलं झालं की होईल व्यवस्थित या मानसिकतेनं सासरी किती लेकींचा जीव गेला असेल याचा अंदाज या महाकाय खंडप्राय देशात अंदाज लावणे कठिण आहे. सासरच्या मोगलाई अत्याचाराने अनेक मुलींनी आपली जीवनयात्रा गळ्याला गळफास लावून संपवली आहे. त्याला आई वडिलांना काय वाटेल? माहेरी गेल्यानंतर समाज काय म्हणेल? ही मानसिकता तितकीच कारणीभूत आहे. मात्र, या सर्व थोताडांना फाट्यावर मारून रांचीमधील (Father Brings Back Daughter in Ranchi) रिअलमधील 56 इंच निधड्या छातीच्या बापानं आपल्या काळजाच्या तुकड्याला अत्याचाराच्या हवाली न करता सरळ बँड बाजा बारातमध्ये घरी आणत देशातील तमाम बापाना आदर्श दिला आहे. 


धुमधडाक्यात लग्न लावूनही सासरच्या विकृत प्रवृत्तीने छळ सुरु केल्यानंतर हताश झालेल्या बापानं आणखी कोणताही विचार न करता सासरच्या लोकांना घडवलेली अद्दल सोशल मीडियातही चर्चेचा विषय झाली आहे. 


वाजतगाजत लेकीला घरी घेऊन आले


झारखंड राज्यातील (Jharkhand) असलेल्या प्रेम गुप्ता यांनी आपली लेक साक्षीचा धुमधडाक्यात विवाह केला होता. मात्र, मुलीला सासरकडून त्रास होत असल्याचे पाहून वडिलांनी बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत मुलीला घरी आणले. त्यांनी आपल्या कृतीतून नवरात्रीच्या काळात समाजाला संदेश देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे. साक्षीचा लग्नानंतर सासरकडून छळ होत होता. याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला तेथून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.






मुली खूप मौल्यवान असतात


साक्षीने ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, असा बाप मिळाल्याने खूप भाग्यवान आहे. साक्षीचे वडील प्रेम गुप्ता यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि दिखाऊपणाने केले जाते. जोडीदार आणि कुटुंब चुकीचे निघाले किंवा चुकीचे काम केले तर आपल्या लाडक्या मुलीला त्याच सन्मानाने घरी आणले पाहिजे. कारण मुली खूप मौल्यवान असतात. या संदेशामुळे समाजातील लोकांची विचारसरणी नक्कीच बदलेल.


लग्न सुद्धा फसवून केलं


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार 28 एप्रिल 2022 रोजी साक्षी गुप्ताचे लग्न सचिन कुमार नावाच्या तरुणासोबत झाले होते. सचिन झारखंड वीज वितरण महामंडळात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो रांची येथील सर्वेश्वरी नगर येथील रहिवासी आहे. लग्नानंतर काही दिवसांपासून साक्षीचा छळ सुरू झाला. तब्बल एक वर्षानंतर साक्षीला कळाले की, ज्या व्यक्तीसोबत तिचे लग्न झाले आहे, त्याचे दोनदा लग्न झाले आहे. त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.


नातं वाचवण्यासाठी प्रयत्न, पण.. 


साक्षीने सांगितले की, इतकं मोठा हादरा बसूनही हिंमत हारली नाही. नातं वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण जेव्हा वाटले की हे नाते सोडणं हेच हिताचं आहे, तेव्हा वडिलांना सांगितले आणि घरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. वडिलांनी सासरच्या घरातून बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली आणि घरी परत आणले. दरम्यान, घटस्फोटासाठी साक्षीने कोर्टात केस दाखल केली आहे. या घटस्फोटाला लवकरच कायदेशीर मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या