PM Modi : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा आता उडणार आहे. त्याआधीच कर्नाटकमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक शेतकरी पंतप्रधान मोदींच्या फोटोला चुंबन करत त्यांचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांसह विविध योजना सुरू केल्याने मोठा फायदा झाला असल्याचे या शेतकऱ्याने म्हटले.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींचे कौतुक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर जी-20 परिषदेच्या निमित्ताने जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींवर पंतप्रधान मोदी यांचा फोटो आहे. या फोटोला पाहुन हा शेतकरी त्यांचे कौतुक करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस स्टॅण्डवरील आहे. नेमकं ठिकाणी अद्याप स्पष्ट झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे पाहून हा शेतकरी म्हणाला की, पोस्ट ऑफिस कार्यालयात आम्ही 1000 रुपये गुंतवले. त्यानंतर आम्हाला 500 रुपये मिळाले. आमच्या घरासमोर हिरवळ कायम राहावी असे तुम्ही म्हणालात. आरोग्यासाठी 5 लाख रुपयांची तरतूद केली. तुम्ही जग जिंकल आहे, तुम्हाला सलाम, तुम्हाला प्रणाम करतो, असे शेतकरी या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओ!
हा व्हिडीओ मोहनदास कामथ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. कर्नाटकातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेले हे नितांत प्रेम आहे. या भावनिक व्हिडीओमध्ये शेतकरी आपल्या लाडक्या पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यावर नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वसामान्यांचे प्रेम आहे, याचा हा पुरावा असल्याचे काहींनी म्हटले. व्हिडिओतील वृद्धाची भाषा पाहिल्यास तो जुन्या म्हैसूर भागातील असल्याचे काहींनी म्हटले.
कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात मतदान
राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेमुळे या दक्षिणेकडील राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस यांच्यातील निवडणूक युद्धाचं बिगुल वाजलं आहे. धर्मनिरपेक्ष जनता दल हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे.