Fake IPS पाटणा : राज्यातील प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससी आयोगानेस्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांच्या चाचणीत विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर, पूजा खेडकर यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक केल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, बोगस अधिकारी आणि बनावट आयएएस, आयपीएस (IPS) यांचा भांडाफोड होत आहे. त्यातच, आता बिहारच्या जुमई जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येतील सिकंदरा पोलिसांनी (Police) एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक केलीय. साहब आईए, आपका स्वागत है... असे म्हणत येथील पोलिसांनी या ठगास अटक करुन चौकशी केली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणीतरी 2 लाख रुपये देऊन याची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मिथलेश कुमार असं बोगस आयपीएस बनलेल्या तरुणाचं नाव असून तो लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस ठाणे क्षेत्रातील गोवर्धन बिघा गावचा रहिवाशी आहे. मिथलेश कुमार याची 2 लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली असून नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. 


मिथलेश हा आयपीएसची वर्दी, डोक्यावर टोपी, कमरेला पिस्टल लटकवून आपल्या घरातून बाईकवर निघाला होता. विशेष म्हणजे त्याचा बाईकही साधारण दोन लाख रुपये किंमतीची असेल. मिथलेश हा सिकंदरा चौक येथे थांबला असता त्याला पाहण्यासाठी लोकांनी तिथं गर्दी केली होती. मिथलेशचा अवतार पाहून अनेकांना ही बोगसगिरी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे, गर्दीतील एकाने सिकंदरा पोलीस ठाण्याचे अधिकारी मिंटू कुमार सिंह यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर, सिकंदरा पोलिसांनी मिथलेश कुमारला येथून ताब्यात घेतलं. तसेच, त्याच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 


मिथलेशच्या रहिवाशी परिसरातील मनोज सिंह याने पोलिसांत नोकरी लावतो म्हणत, त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, मिथलेशने आपल्या मामाकडून 2 लाख रुपये घेऊन मनोज सिंहला दिले. आपल्याला पोलीस खात्यात नोकरी लागेल, या अपेक्षेने त्याने पैसे दिल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मनोज सिंहने 2 लाख रुपये घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी आयपीएसची खाकी वर्दी, पिस्टल आणि टोपीही मिथलेशला दिली. त्यामुळे, नवी वर्दी घालून आईचा आशीर्वाद घेऊन मिथलेश मनोज सिंहकडे उरलेले 30 हजार रुपये देण्यासाठी निघाला असताच त्याच्या रंगरुप आणि पेहरावावरुन त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.  


हेही वाचा


नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बस सुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट