Fake Embassy Case: आतापर्यंत बनावट नोटा, बनावट खते, बियाणे, भेसळ, बनावट सरकारी नोकरी असा प्रकार बऱ्याचवेळा समोर आला असला, तरी आता थेट चक्क बोगस दुतावासाचा पदार्फाश झाला आहे. हर्षवर्धन जैन भाड्याच्या फ्लॅटमध्ये चालवलेल्या रॅकटने डोक्याला हात लावायची वेळ आली आहे. एसटीएफने बनावट दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात हर्षवर्धन जैन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तो वेस्ट आर्क्टिका देशाचा बनावट दूतावास चालवत होता. हर्षवर्धनवर लोकांना परदेशात काम मिळवून देण्यासाठी नोकरी रॅकेट चालवण्याचा आरोप आहे आणि तो मनी लाँड्रिंग नेटवर्कचाही भाग होता.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका आलिशान बंगल्यावर स्पेशल टास्क फोर्सच्या नोएडा युनिटने छापा टाकला. छाप्यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. हर्षवर्धन कवीनगर येथे घर भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिकचा दूतावास चालवत होता आणि तो स्वतःला वेस्ट आर्क्टिक, सेबोर्गा, पुलविया, लोडोनियाचा राजदूत म्हणवून घेत असे. तो बनावट नंबर प्लेट असलेल्या अनेक वाहनांचा वापर करत असे.
पंतप्रधानांसोबत बनावट फोटो दाखवून फसवणूक
पीटीआयच्या वृत्तानुसार, एसटीएफने म्हटले आहे की, "हर्षवर्धन पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांसोबतचे त्याचे फोटो देखील लोकांना दिशाभूल करण्यासाठी वापरत असे. त्याने हे फोटो त्यांच्याशी जुळवून तयार केले होते." सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की हर्षवर्धनचे मुख्य काम परदेशात लोकांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली दलाली करणे होते. तो शेल कंपन्यांद्वारे हवालाचे कामही करत होता. एसटीएफने सांगितले की, "चौकशीदरम्यान असे आढळून आले की हर्षवर्धन पूर्वी चंद्रास्वामी आणि अदनान खगोशी (आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र विक्रेता) यांच्या संपर्कात होता. यापूर्वी 2011 मध्ये हर्षवर्धनकडून एक बेकायदेशीर सॅटेलाईट फोनही जप्त करण्यात आला होता, ज्याचा एक गुन्हा कविनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे."
लक्झरी गाड्यांवर बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 'डिप्लोमॅटिक नंबर प्लेट' असलेल्या चार आलिशान कार, दोन देशांचे 12 डिप्लोमॅटिक पासपोर्ट, परराष्ट्र मंत्रालयाचा शिक्का असलेले बनावट कागदपत्रे, दोन बनावट पॅन कार्ड, अनेक देशांचे आणि कंपन्यांचे 34 सील, दोन बनावट प्रेस कार्ड जप्त केले आहेत. यासोबतच 44.70 लाख रुपये रोख, अनेक देशांचे परकीय चलन आणि कंपन्यांचे कागदपत्रे देखील सापडली आहेत. आरोपींकडून 18 डिप्लोमॅटिक नंबर प्लेट सापडल्या आहेत. या प्रकरणी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या