मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज वायरल होत आहेत मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, नोटाबंदीनंतर बाजारात आलेली दोन हजार रुपयांची नोटही आता बंद झाली आहे. सरकार पुन्हा एकदा एक हजार रुपयांची नोट आणण्याची तयारी करत आहे. या मेसेजमध्ये सोशल मीडियात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही उल्लेख आहे. जाणून घेऊया या वायरल मेसेजची सत्यता काय आहे?


वायरल मेसेजमधील दावा काय आहे?
वायरल मेसेजनुसार, रिझर्व बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2020 पासून एक हजारच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे. तर 2000 रुपयांच्या सर्व नोटा परत घेतल्या जाणार आहे. तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या नोटाच बदलता येऊ शकतात. लवकरात लवकर बदला. म्हणजे वायरल मेसेजनुसार, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. तर तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील तर त्या आता काही कामाच्या नाहीत. हा मेसेज वाचणारा प्रत्येक व्यक्ती गोंधळात आहे.





सत्य काय आहे?
ही केवळ एक अफवा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बँकांनी हे स्पष्ट केलं आहे की बाजारात उपलब्ध दोन हजारच्या नोटा चलनातून बंद झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी एका आरटीआयला उत्तर देताना रिझर्व बँक ऑफ इंडियाने सांगितलं होतं की, दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. परंतु बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केलेल्या नाहीत. तसंच दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश जारी केला नसल्याचंही आरबीआयने स्पष्ट केलं. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. मेसेजच्या रुपात वायरल होणारं वृत्त चुकीचं आहे.

याशिवाय रिझर्व्ह बँक 1000 रुपयांची नोट बाजारात आणणार असल्याचा दावाही खोटा आहे. यापूर्वी सोशल मीडियावर 1000 रुपयांच्या नव्या नोटेचा एक फोटो तुफान वायरल झाला होता.



नोटाबंदीला तीन वर्ष पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचं मोदींनी सांगितलं. या निर्णयामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या आणि 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या.