ED News : काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर पंजाबमध्ये महिन्यभरातच काँग्रसचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यामागे ईडीची (ED) चौकशी लागली आहे. ईडीकडून चरणजीत सिंह चन्नी यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे चन्नी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने चरणजित सिंग चन्नी यांना वाळू उत्खनन प्रकरणात चौकशी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणी ही चौकशी केली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांची जालंधर येथील ईडीच्या झोन कार्यालयात चौकशी करण्यात आली. 


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चन्नी यांच्या भाच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती. ईडीने कर चुकवेगिरी प्रकरणात त्यांचे भाचे भूपिंदरसिंग हनी यांना अटक केली होती. या प्रकरणामुळं पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ही कारवाई राजकीय असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अवैध वाळू उपसा प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली होती.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने चरणजीत सिंह चन्नी यांना यापूर्वी अनेकदा समन्स पाठवले होते. ईडीच्या अधिकार्‍यांनी चन्नी यांचे हनी आणि इतरांशी असलेले संबंध आणि त्यांच्या भाच्याने मुख्यमंत्री कार्यालयात केलेल्या काही भेटींबद्दल चौकशी केली. राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाचा एक भाग म्हणून काही अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती केल्याच्या आरोपांबाबत चरणजित सिंग चन्नी यांची चौकशी करण्यात आली.
 
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राज्यातील काँग्रेसमधील धुसफूस वाढली आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत. चन्नी यांच्या चेहऱ्यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही पक्षाने निवडणुकीत चेहरा बदलला नाही, असे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस देखील असल्याचे पाहायला मिळत आहे.


कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लागली होती. कॅबिनेट मंत्री आणि तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे पंजाबमध्ये पहिले मागासवर्गीय मंत्री होते. मात्र, त्यांना चमकौर साहिब व भदौड या दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसेच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी पंजाब हे एकमेव राज्य काँग्रसच्या ताब्यात होते. मात्र, तिथेही कँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसची पंजाबमध्ये ताकद कमी झाली आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपने वर्चस्व राखले आहे, तर पंजाबमध्य आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: