मुंबई: फॉरेन एक्सचेन्ज मॅनेजमेन्ट अॅक्टच्या (FEMA) उल्लंघनाच्या प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधात तपास सुरु केला आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की फेमा कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅमेझॉनच्या विरोधात ईडीने तपास सुरु केलाय.


या कारवाईचे निर्देश वाणिज्य मंत्रालयाकडून ईडीला देण्यात आले असल्याची माहिती मिळते. अॅमेझॉनसोबतच आता फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांविरोधातही फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या कंपन्यांसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता मुंबईतील बिल्डर, ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना अटक


या आधी दिल्ली उच्च न्यायालयानेही अॅमेझॉन विरोधात टिप्पणी केली होती. अॅमेझॉनने रिलायन्स समूह आणि फ्यूचर रिटेल ग्रुपमध्ये झालेल्या कराराला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना सांगितलं होतं की काही तडजोडींच्या माध्यमातून फ्यूचर रिटेल ग्रुपवर अॅमेझॉन आपले अप्रत्यक्ष स्वरुपात नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे फेमा आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक कायद्याचं (FDI) उल्लंघन समजले जाईल.


दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी आणि वाणिज्य मंत्रालयाचे निर्देश आल्यानंतर ईडीने अॅमेझॉन विरोधात तपास सुरु केला आहे. यावर अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की ईडीच्या या तपासाबद्दल अॅमेझॉनला अजून तरी काहीच माहित नाही. सूत्रांनी सांगितलं की ईडी आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे आणि लवकरच अॅमेझॉनकडून याची सविस्तर माहिती मागवण्यात येणार आहे.


Amazon Academy | JEE सह अन्य स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आता 'अमेझॉन अकॅडमी'