नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. काल उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन पायउतार झाल्यानंतर पंतप्रधानांना आता दुसरा धक्का बसला आहे. काल उर्जित पटेल आणि आज सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मंगळवारी सुरजीत भल्ला यांनी ट्विटरवरुन पायउतार झाल्याची माहिती जाहीर केली. भल्ला यांनी केलेल्या ट्वीटनुसार त्यांनी 1 डिसेंबर रोजी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहीती त्यांनी आज दिली. परंतु भल्ला यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही.

निती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय हे ईएसी-पीएमचे (पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती ) अध्यक्ष आहेत. त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ रथिन रॉय, आशिमा गोयल आणि आशिमा गोयल आणि शमिका रवी हे अल्पकाळासाठी सदस्य आहेत. त्यांच्यासोबत सुरजीत भल्लादेखील अल्पकाळासाठी सदस्य होते.

दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया, पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, काल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यानी राजीनामा दिला आहे. या चार जणांनंतर आता सुरजीत भल्ला यांनीदेखील राजीनामा दिल्यामुळे सगळेच अर्थतज्ज्ञ मोदी सरकारला सोडून का जात आहेत, अशी चर्चा रंगली आहे.