Drugs Case : दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा कोर्टानं फेटाळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ पिठाणीचा जामीन अर्ज एनडीपीएस कोर्टात दाखल करण्यात आला होता. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, म्हणजेच एनसीबी (NCB)चे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी यासंदर्भात आणखी माहिती देताना सांगितलं की, सिद्धार्थच्या जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला असून तो जामिनासाठी पात्र नव्हता. दरम्यान, यापूर्वीबी सिद्धार्थ पिठाणीनं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, सिद्धार्थला त्याच्या लग्नासाठी 25 जून रोजी कोठडीतून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सिद्धार्थने 2 जुलै रोजी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो एनसीबीच्या ताब्यात आहे.
सिद्धा्थ पिठाणीवर गंभीर आरोप
सिद्धा्थ पिठाणीवर सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवणं आणि त्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सिद्धार्थला एनडीपीएस कायद्याच्या कलम -27 ए अंतर्गत अटक करण्यात आली होती. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्यूनंतर एनसीबीनं काही व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे बॉलिवूडमधील ड्रग्सच्या वापराचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी अनेक लोकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यापैकी बहुतेक जण सध्या जामिनावर बाहेर आहेत.
सिद्धार्थ हा सुशांतचा फ्लॅटमेट, त्याचा मित्र असून, सदर प्रकरणामुळं मुंबई पोलीस, सीबीआय आणि ईडीकडूनही त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, जून 8 ते जून 14, 2020 या काळात नेमकं काय घडलं होतं, याची माहिती सिद्धार्थनं पोलिसांना तपास-चौकशीदरम्यान दिली. दिशा सालियन हिच्या मृत्यूचा सुशांतवर काय आणि कसा परिणाम झाला हेसुद्धा त्यानं सांगितलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ पिठाणी हा पहिला व्यक्ती आहे, ज्यानं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला गेल्या वर्षी 14 जून रोजी त्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं होतं.