नवी दिल्ली : सन 2009 साली दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या डॉ. मनमोहन सिंह यांना कारकिर्दीच्या शेवटच्या काळात मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यूपीए 2 सरकारमधील अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. या सरकारचे प्रमुख म्हणून मनमोहन सिंह यांच्यावर नरेंद्र मोदी आणि भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला उत्तर दिलं. माझ्या कामाचं मूल्यमापन करताना वेळ अधिक उदार असेल, इतिहास माझ्या कामाचं उदारतेने मूल्यमापण करेल असं मनमोहन सिंह यांनी म्हटलं होतं.


देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. देशाने एक अर्थतज्ज्ञ आणि सुशील राजकारणी नेता गमावला. त्यांच्या निधनानंतर आता हळहळ व्यक्त केली जात आहे. 


सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप


डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर आता त्यांनी 10 वर्षांपूर्वी जे वक्तव्य केलं होतं ते लोकांच्या हृदयात आणि मनात गुंजत आहे. जानेवारी 2014 चा हा काळ होता. देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होती. 10 वर्षे यूपीए सरकारचे प्रमुख राहिलेले मनमोहन सिंग पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रसारमाध्यमांकडून त्यांच्यावर अनेक तिखट प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम आणि CWG घोटाळा याबाबत पंतप्रधान गोत्यात आले होते.


इतिहास माझ्या कामाचे मूल्यमापण करेल


मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मौन बाळगून त्यांना मनमानी कारभार करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप मनमोहन सिंहांवर होत होता. दरम्यान, एका पत्रकाराने मनमोहन सिंग यांना विचारले की, भाजप आणि नरेंद्र मोदी तुम्ही कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप करतात. तुमच्याच पक्षाने तुम्हाला कमकुवत केले आहे का? या प्रश्नावर मनमोहन सिंग काही काळ मौन बाळगून राहिले. मग ते अगदी शांत स्वरात म्हणाले, "मी कमकुवत होतो की नाही हे इतिहासच ठरवेल."


दुसऱ्या पत्रकाराने विचारले की, तुमच्याबद्दल असे बोलले जाते की तुमचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही. तुमचे म्हणणे ऐकले जात नाही आणि तुम्ही मौन बाळगता. त्यावर डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, "माझा विश्वास आहे की, सध्याच्या माध्यमांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल. मंत्रिमंडळात काय होते ते मी सर्व काही सांगू शकत नाही."


देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. वयाच्या 92 वर्षी त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26  सप्टेंबर 1932 रोजी, सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला होता. नम्र स्वभाव, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी अशी त्यांची ओळख होती.  1991 ते 1996 पर्यंत भारताचे मनमोहन सिंग अर्थमंत्री होते.


पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना, त्यांनी देशात आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती.  मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो. मनमोहन सिंग यांची भारतातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांमध्ये गणना होते. मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. लोकसभा निवडणूक न जिंकता दोनदा देशाचे पंतप्रधान होणारे ते पहिले आणि एकमेव राजकारणी आहेत.


ही बातमी वाचा: