कोल्हापूर :तब्बल 30 हजार फूट उंचीवर धावत असलेले विमान… चारही बाजूंनी बंद दरवाजे… मदतीसाठी कोणतेही रुग्णालय नाही, कोणतेही उपकरण नाही… आणि त्या क्षणी एका परदेशी महिला प्रवाशाचा जीव हातातून निसटत होता. त्या थरारक क्षणी मृत्यू आणि जीवनाच्या सीमारेषेवर उभी असलेली ती महिला वाचली, कारण त्या विमानात देवदूतासारखी एक व्यक्ती उपस्थित होती... डॉ. अंजली निंबाळकर (Dr. Anjali Nimbalkar).

गोवा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या 6E 2091 या विमानात (IndiGo Airlines) उड्डाणादरम्यान एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग घडला. पण त्याचवेळी विमानात असलेल्या डॉ. अंजली निंबाळकरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 34 वर्षांच्या अमेरिकन महिला प्रवाशाचे प्राण वाचले.

डॉ. अंजली निंबाळकर या बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या माजी आमदार आणि काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आहेत. तसेच कोल्हापूरचे सुपूत्र आणि कर्नाटकचे धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर (Hemant Nimbalkar IPS) यांच्या त्या पत्नी आहेत.

Anjali Nimbalkar News : नेमकं काय घडलं?

गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात उड्डाणानंतर काही क्षणांतच अचानक HELP असा हतबल आक्रोश घुमला. एक 34 वर्षांची अमेरिकन महिला प्रवासी बसल्या जागेवरच कोसळली. तिचे शरीर थंड पडले होते, हाताची नाडी जवळपास थांबली होती आणि श्वास घेण्याची क्षमता क्षीण होत चालली होती.  विमानात एकाचवेळी भीती आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

काय करावे, कसे करावे, हे सूचायच्या आधीच डॉ. अंजली निंबाळकर जागेवरुन उठल्या. कुठलीही वैद्यकीय साधने नाहीत, इंजेक्शन नाहीत, IV लाईन नाही...तरीही त्यांनी प्रसंगावधान राखत सीटवरच कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन (CPR) सुरू केला. त्या महिलेच्या बहिणीकडून तिची हेल्थ हिस्ट्री जाणून घेतले आणि त्यानुसार प्राथमिक उपचार सुरू केले. काही मिनिटांत त्या परदेशी महिलेला शुद्ध आली. मृत्यूला हरवून जीवन परत आले, असेच ते क्षण होते.

त्या महिलेने पोटाच्या तक्रारीमुळे दोन दिवसांपासून अन्न न घेतल्याचे आणि उड्डाणापूर्वी औषधे घेतल्याचं समोर आलं. शुद्धीवर येताच तिला तात्काळ इलेक्ट्रोलाइट्सचे पाणी देण्यात आले.

Medical Emergency On Flight : पुन्हा ती मरणाच्या दारात

सगळं काही सुरळीत झालं असं वाटत होतं, मात्र ही लढाई इथेच संपली नव्हती. काही वेळातच ती महिला पुन्हा एखाद्या मृतासारखी शांत झाली. शरीर थंड आणि निळसर पडले, बोलण्याची शक्ती संपली. विमान उतरण्यास अजून दीड तास बाकी होता. 'आपण तिला गमावतोय' अशी भावना क्षणभर मनात येऊन गेली. पण अंजली निंबाळकरांनी हार मानली नाही.

Anjali Nimbalkar Saves Life : युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

ती महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या आजूबाजूच्या सीट्स मोकळ्या करून, उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांमध्ये, पुन्हा एकदा तिचा जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली. तब्बल 15 ते 20 मिनिटे मृत्यूशी दोन हात करत, अखेर त्या महिलेची हाताची नाडी पुन्हा सुरू झाली. रक्तदाब मोजण्यात आला, शरीरात पुन्हा उष्णता निर्माण झाली. त्या परदेशी महिलेच्या बहिणीने पूर्ण आशा सोडली होती, अशाही स्थितीत अंजली निंबाळकरांनी, हार न मानता त्या महिलेला मृत्यूच्या दारातून परत आणलं.

संपूर्ण उड्डाणभर,जवळपास अडीच तास डॉ. अंजली निंबाळकर त्या महिलेजवळ उभ्या होत्या. त्यांनी एक क्षणही नजर हटवली नाही. दरम्यान, आवश्यक ते प्राथमिक उपचार सुरूच ठेवले. दुसरीकडे, इंडिगोचे विमान कर्मचारी आणि वैमानिक यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दिल्ली विमानतळावर तातडीची रुग्णवाहिका, डॉक्टर आणि प्रायोरिटी लँडिंगची व्यवस्था केली.

American Woman Saved On Flight : निंबाळकरांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव

विमान जमिनीवर उतरले… रुग्णवाहिकेचे दरवाजे बंद झाले… आणि त्या क्षणी डॉ. अंजली निंबाळकरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. कारण 30 हजार फूट उंचीवरून त्यांनी एका अनोळखी परदेशी महिलेचा जीव वाचवला होता, तिला मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं.

डॉ. अंजली निंबाळकरांनी ज्या अमेरिकन महिला प्रवाशाचा जीव वाचवला तिचे नाव जेनी आहे. ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची रहिवासी. योगायोग असा की जेनीच्या सासूचे नावही डॉ. अंजली असून त्या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. कदाचित नियतीनेच त्या दिवशी एका अंजलीला दुसऱ्या अंजलीच्या सुनेचे प्राण वाचवण्यासाठी पाठवले असावे.

देव कुणी पाहिला नाही, पण सगळं काही संपलं असं वाटत असताना देवासमान माणसे मात्र अवतरतात… अनपेक्षित क्षणी पुढे येतात आणि एखाद्याच्या श्वासात पुन्हा जीवन फुंकतात. 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर यांनी तेच करून दाखवलं. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी वाचा: