India: भारत आणि पाकिस्तानच्या  तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्यानंतर, देशभरात "बॅन टर्की" चळवळ उभी राहिली आहे. पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकून निर्णायक कारवाई केली. स्थानिक आयातीऐवजी इतर व्यापाऱ्यांकडून खरेदी करणे पसंत करून सामान्य नागरिकदेखील या चळवळीत मोठे योगदान देत आहेत. दरम्यान आता भारतीय चित्रपट निर्मात्यांना  वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज फेडरेशन (FWICE) ने  तुर्कीला शूटिंग लोकेशन म्हणून निवडण्यापासून टाळण्याची विनंती केलीय.  तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने पाठिंबा दाखवल्याने भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात उभं राहत असल्याने हे आवाहन करण्यात आलं आहे.             

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले.राजनैतिक भूमिका घेण्याची वेळ आल्यानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला. मात्र तुर्कस्तानने पाकिस्तानची बाजू घेतली. पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला. तुर्कीने घेतलेल्या प्रत्येक पाकिस्तानच्या ड्रोनला खाली पाडत भारताने आपली शस्त्रसज्जता दाखवली. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आता तुर्कीविरोधात भारत ॲक्शन मोडवर आलाय. FWICEने भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्कीला लोकेशन म्हणून न निवडण्याचं आवाहन केलंय.

चित्रपटांचं लोकेशन म्हणून तुर्कीला निवडू नका

एफडब्ल्यूआयसीई ही भारतीय मिडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील 36 प्रकारच्या कारागिर, तंत्रज्ञ आणि कलाकारांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यांनी अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही देशात भारतीय चित्रपट उद्योगाने गुंतवणूक करू नये. फेडरेशनने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की, “राष्ट्र सर्वप्रथम आहे”. अशा परिस्थितीत, जेव्हा तुर्की आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभी राहत आहे, तेव्हा भारतातील चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीत जाऊन चित्रिकरण करण्याचे टाळावे. असं फेडरेशनने म्हटलं आहे.

राष्ट्रहितासाठी तुर्कीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “तुर्कीची भूमिका केवळ राजनैतिक पातळीवरच नव्हे तर विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या विरोधात राहिली आहे. अशा वेळी, भारतीय संस्कृती आणि भावनांशी जोडलेला आपला चित्रपट उद्योग या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही.” एफडब्ल्यूआयसीईने सर्व प्रोडक्शन हाऊसेस, लाइन प्रोड्यूसर्स, दिग्दर्शक, अभिनेते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना राष्ट्रहितासाठी तुर्कीचा बहिष्कार करण्याचे आणि तिथं चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे, जोपर्यंत तुर्कीआपली कूटनीतिक भूमिका बदलत नाही आणि भारताबाबत आदरयुक्त भूमिकेची कबुली देत नाही. “आपली एकता या काळात खूप महत्त्वाची आहे. आपण ठाम संदेश द्यायला हवा की भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही आशा करतो की संपूर्ण चित्रपटसृष्टी या आवाहनाचा आदर करेल आणि राष्ट्रहितात योग्य निर्णय घेईल.” फेडरेशनने म्हटलंय.

हेही वाचा:

बुडत्या पाकिस्तानला IMF चा पुन्हा आधार, 8400 कोटी रुपयांचं दुसरं कर्ज मंजूर, भारतानं व्यक्त केला निषेध