Dog VS Snake: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पाळीव कुत्र्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचले, पण कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला. मध्यरात्री झोपेत असताना एक विषारी साप घरात शिरला. पाळीव कुत्र्याने त्या सापाला पाहिलं आणि जोरजोरात भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले पण तोपर्यंत सापाने कुत्र्याला अनेक वेळा चावा घेतला होता. कुत्र्याने सापाला आपल्या जबड्यात धरले आणि सापाने अनेकदा चावा घेतल्यानंतरही त्याला सोडलं नाही. 

कुत्र्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण..

खूप प्रयत्नांनंतर कुटुंबाने सापाला पकडले आणि प्लास्टिकच्या पिशवीत भरून जंगलात सोडले. यानंतर, कुत्र्याला रुग्णालयात नेण्यात आलं, त्याच्यावर उपचार करण्यात आले परंतु एका दिवसानंतर कुत्र्याचा मृत्यू झाला. ही घटना मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरातील मोहल्ला रामपुरी येथील आहे, जिथे 2-3 मे रोजी रात्री 3 वाजताच्या सुमारास गावातील रहिवासी कल्लू या शेतकरीच्या घरात एक विषारी साप शिरला. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते. असेही सांगितले जात आहे की, त्यांचा एक मुलगा गेटच्या समोर झोपला होता. त्यांची पाळीव कुत्री तिचे नाव मिनी आहे तिने सापाला घरात येताना पाहताच त्याला अडवू लागली. सापाने मिनीला अनेक ठिकाणी चावा घेतला. भुंकण्याचा आवाज ऐकून सर्वांचे डोळे उघडले आणि कुटुंबातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले तर त्यांची कुत्री मिनी सापाला घरात येण्यापासून रोखत होती.

मिनीने सापाला तिच्या जबड्यात पकडला

मिनीने सापाला तिच्या जबड्यात पकडला होता, त्यावेळी साप मिनीला वारंवार चावत होता. पण मिनीने त्याला सोडलं नाही. काही वेळाने मिनी बेशुद्ध पडली आणि मोठ्या प्रयत्नानंतर कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या मदतीने सापाला पकडले आणि प्लास्टिकच्या पिशवीत बंद केले आणि नंतर जंगलात सोडले. मिनीला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि ती 27 तास मृत्यूशी झुंज देत होती. अखेर काल तिचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी मिनीला घरी आणले तेव्हा ती एक महिन्यापेक्षा कमी वयाची होती आणि तिला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे प्रेमाने सांभाळत होते.

या प्रकरणात मेरठचे डीएफओ राजेश कुमार म्हणाले की, एका घरात साप चावल्याने एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. तो साप रसेल व्हायपर जातीचा असल्याचे सांगण्यात आले. वन विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सध्या तरी, आम्ही सर्वांना आवाहन करतो की जर कुठेही असे विषारी वन्य प्राणी दिसला तर त्यापासून अंतर ठेवा आणि शक्य तितक्या लवकर वन विभागाला कळवा. पोलिस किंवा जिल्हा प्रशासनामार्फत वन विभागाला माहिती द्या जेणेकरून त्याचे संरक्षण होईल आणि तुमचेही संरक्षण होईल.