Dushyant Dave-Tushar Mehta : न्यायालयात अनेकदा आपल्या अशिलाची बाजू मांडताना वकिलांमध्ये वाद विवाद होतात. पण हा वाद कधीकधी फार वाढतो. असाच प्रकार आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पाहायला मिळाला. उत्तर प्रदेश सरकारच्या (UP Government) बुलडोजर कारवाई प्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात आपापली बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहता (Tushar Mehta) आणि वरिष्ठ वकील दुष्यंत दवे (Dushyant Dave) यांच्यात जोरदार घमासान झालं. दोघांमधील वाढता वाद पाहून कोर्टाने कोपरखळी मारत मजा घेतली. "तुम्ही खुलेआम एकमेकांसाठी एवढं प्रेम दाखवू नका," असा टोला कोर्टाने लगावला.


सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी का केली?


बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती जेबी पारदिवाला यांच्या खंडपीठासमोर सुरु होती.  यादरम्यान वकिलांमध्ये वाद सुरु झाला आणि वातावरण तापल्यानंतर कोर्टाने  म्हटलं की, "तुम्ही दोघे एकमेकांसाठी एवढं प्रेम आणि स्नेह दाखवू नका. आमची तुम्हाला एवढची विनंती आहे." 


दोघांमध्ये वाद का सुरु झाला?


दुष्यंत दवे यांनी कोर्टात म्हटलं की, सध्या बुलडोजर कारवाई भाजपचा ट्रेण्ड बनला आहे. या दरम्यान त्यांचा आवाज थोडा वाढला. यावर तुम्ही अशाप्रकारे ओरडू शकत नाही, असं तुषार मेहता म्हणाले. कोणत्याही तयारीशिवाय असे दावे करणं चुकीचं आहे आणि कोर्टाने याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण ते हताशपणे अशाप्रकारचे दावे करत आहेत. याला उत्तर देताना दुष्यंत दवे म्हणाले की, माझे मित्र मिस्टर मेहता मला 40 वर्षांपासून ओळखतात आणि तरीही त्यांना माहित नाही की मी मोठ्या आवाजातच बोलतो. ते सतत बोलतात की मी ओरडत आहे. दोन्ही वकिलांमध्ये सुरु असलेल्या या वादावर कोर्टाने संबंधित टिप्पणी केली. यानंतर तिथे उपस्थित आणखी एक वकील संजय हेगडे म्हणाले की, कोर्टाबाहेरही व्हर्बल बुलडोजर ठेवायला हवा.


या प्रकरणावर सुरु होती सुनावणी


सुप्रीम कोर्ट जमियत उलमा-ई-हिंदच्या याचिकेवर सुनावणी करत होतं. यामध्ये प्रयागराजमध्ये यूपी सरकारने अनेकांवर केलेल्या बुलडोजर कारवाईला आव्हान देण्यात आलं होतं. याचिकेत म्हटलं आहे की, एक टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवरुन भाजपच्या माजी प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांचं बांधकाम बुलडोजरने पाडलं होतं.


हेही वाचा


Article 370 : जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी, केंद्राने प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय?