DK Shivakumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे राज्याचे 24 वे मुख्यमंत्री होतील. बंगळूरुत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांनी त्यांचे नाव सुचवले जे एकमताने मंजूर झाले. काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, डी. के. शिवकुमार 3 जून रोजी सायंकाळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बैठकीनंतर शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतच मंत्रिमंडळातही फेरबदल केला जाईल. मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांना हटवले जाऊ शकते. चार उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे भलत्याच फाॅर्म्युलाची चर्चा रंगली आहे.
सर्व आमदारांनी एकमताने एक ठराव मंजूर केला, ज्यानुसार काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व नवीन नेत्याचा निर्णय घेईल. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांचे नाव नवीन विधिमंडळ पक्षनेते म्हणून प्रस्तावित केले. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आणि सर्व आमदारांनी एकमताने त्याला पाठिंबा दिला. शिवकुमार यांनी एक ठराव मांडला आणि सिद्धरामय्या यांचे आभार मानले.
रोटेशनल फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदी नियुक्ती
शिवकुमार यांची मुख्यमंत्री रोटेशनल फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांनी 20 मे 2023 ते 28 मे 2026 या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि पक्षाचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल हे देखील आजच्या बैठकीला उपस्थित होते. या दोघांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान, सिद्धरामय्या, वेणुगोपाल आणि सुरजेवाला एका वेगळ्या खोलीत गेले आणि त्यांनी आपापसात चर्चा केली. त्यानंतर बैठक पुन्हा सुरू झाली आणि शिवकुमार यांची नेतेपदी निवड झाली.
डीके देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार असलेले डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती ₹1,413 कोटींहून अधिक आहे. ते रिअल इस्टेट, खाणकाम आणि हॉटेल व्यवसायातही आहेत. विशेष म्हणजे, एवढी संपत्ती असूनही, त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात टोयोटा क्वालिस कार आणि ₹263 कोटींच्या कर्जाचा उल्लेख आहे.
काँग्रेसचे संकटमोचक
1962 मध्ये बंगळूरुजवळील कनकपुरा येथे जन्मलेले डी. के. हे वोक्कालिगा समाजाचे आहेत. ते कनकपुराचे आमदार आहेत. काँग्रेस पक्षात ते आमदारांचे पक्षांतर रोखणारे नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही मोठ्या मोहिमेसाठी, निवडणूक व्यवस्थापनासाठी, प्रचारासाठी किंवा गुप्त रणनीतींसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक आणि लॉजिस्टिकल मदतीचे ते कुशलतेने व्यवस्थापन करतात.
तिहार तुरुंगात 50 दिवस घालवले
डी. के. यांच्यावर 19 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. अंमलबारी संचालनालय (ईडी) दोन मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करत आहे. 2017 मध्ये आयकर विभागाने त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 8.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात त्याला 2019 मध्ये अटक करण्यात आली आणि तिहार तुरुंगात 50 दिवस घालवले. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
