नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे आमदार देविंदर सहरावत अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यावर जादूटोणासारख्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप केला असून, याची माहिती एका पत्राद्वारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दिली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून तिकीट वाटपाच्या बहाण्याने महिलांचे शोषण होत असल्याचा, आरोप देविंदर सहरावत यांनी केला होता. पण आता त्यांच्या वडिलांनीच देविंदर यांच्यावर जादूटोण्याच्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप केल्याने स्वत: गोत्यात आले आहेत.
देविंदर यांचे वडील राम प्रकाश सहरावत यांनी आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य ठीक नसून त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हणले आहेत. वडिलांच्या आरोपांवर देविंदर यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या आमदारांवर रोज नवनवे आरोप होत आहेत. यापूर्वी केजरीवालांच्या मंत्रीमंडळातील माजी मंत्री संदीप कुमार यांचे सेक्स स्कॅण्डल समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या नंतर आता आप आमदार देविंदर सहरावत यांच्यावर जादूटोण्याच्या प्रकारात सहभागी असल्याचा आरोप होत आहे.
जबलपूरमधून काळ्या जादूचे ट्रेनिंग घेतले: राम प्रकाश
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राम प्रकाश यांनी केजरीवालांना लिहलेल्या पत्रात, ''2005 साली सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी देविंदर जबलपूरला गेले होते. त्यांनी तेथे काळ्या जादूचे ट्रेनिंग घेतले. काळ्या जादूचे ट्रेनिंग घेत असताना देविंदर यांना नैराश्याने ग्रासले. त्यांना परत आणण्यासाठी इतर दोन मुलांना जबलपूरमध्ये पाठवून रुग्णवाहिकेमधून आणावे लागले.'' यानंतर काहीकाळ दिल्लीतील विमहांस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
संपत्तीसाठी देविंदरकडून जीवे मारण्याची: राम प्रकाश
राम प्रकाश यांनी देविंदर सोबतचे आपले संबंध चांगले नसल्याचे सांगतानाच संपत्तीसाठी सुरु असलेल्या वादात देविंदरने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सैन्य दलातील कर्नल देविंदर
देविंदर सहरावत केजरीवाल यांच्यासोबत सुरुवातीच्या काळापासून आहेत. सध्या ते बिजवासन मतदार संघातून आमदार आहेत. 2013 सालातही त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. देविंदर राजकारणात येण्यापूर्वी सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत होते.