Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...
Swatantra Bhardwaj : सीजेपी आंदोलक निशू आझादचे वडील संजयकुमार आझाद यांना मारहाण करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाजला पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली : सीजेपी आंदोलक निशू आझादचे वडील संजयकुमार यांच्या डोक्याला लोखंडी करड्यानं मारहाण करत दुखापत करणाऱ्या स्वतंत्र आझाद याला दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज याला काल उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज याला अटक केल्यानंतर पतियाळा हाऊस कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या घरी हजर केलं. यानंतर कोर्टानं स्वतंत्र भारद्वाज याला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवलं.
दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज विरोधातील एका जुन्या एफआयआरमध्ये SC/ST एक्ट कलमांचा समावेश केला. याशिवाय दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज विरोधात पोक्सो कायद्यानुसार नवा गुन्हा नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाला अटक केल्यानंतर पतियाळा हाऊस कोर्टात हजर केलं. यानंतर त्याला एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
जंतर-मंतरवरील मारहाणीमुळं अडचणीत
सीजेपीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाच्या काळात स्वतंत्र भारद्वाज यानं सीजेपी आंदोलक निशू आझाद हिचे वडील संजयकुमार आझाद यांना मारहाण केली होती. या मारहाणीसंदर्भात स्वतंत्र भारद्वाजनं एका पॉडकास्टमध्ये माहिती दिली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भारद्वाजवरील कारवाईसाठी दिल्ली पोलिसांवरील दबाव वाढला होता.
स्वतंत्र भारद्वाजच्या व्हिडिओची क्लिप 3 सप्टेंबरला सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या व्हिडिओत त्यानं निशू आझादच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी कड्यानं मारहाण करुन देखील तुरुंगात गेलो नसल्याचं म्हटलं होतं. स्वतंत्र भारद्वाज यानं ज्या व्यक्तीच्या डोक्यात मारलं त्याला 60 टाके पडले होते. राजकीय संबंधामुळं तुरुंगात जावं लागलं नाही, असंही भारद्वाजनं म्हटलं होतं. व्हायरल व्हिडिओत स्वतंत्र भारद्वाज यानं कपिल मिश्रा आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची नावं घेतली होती.
स्वतंत्र भारद्वाजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निशू आझाद हिनं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. राहुल गांधी यांनी देखील निशू आझादच्या पोस्टला रिप्लाय केला होता. तर, काल सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास आणि काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे विनोद जाखड, खासदार चंद्रशेखर आजाद यांच्यासह इतर कार्यकर्ते नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले होते. स्वतंत्र भारद्वाजला 72 तासात अटक करावं अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






















