,नवी दिल्ली : दिल्लीतील फोटोग्राफर अंकित सक्सेना हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अंकितच्या गर्लफ्रेण्डच्या आईने स्कूटरवरुन त्याच्या कारला धडक मारली. त्यानंतर अंकित कारबाहेर येताच त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती.


गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर 23 वर्षीय अंकितची हत्या झाली होती. अंकितची 20 वर्षीय गर्लफ्रेण्ड शहजादीच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं.

अंकित आणि शहजादी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र शहजादीच्या कुटुंबीयांना दोघांनी आंतरधर्मीय लग्न करणं मान्य नव्हतं.

शहजादीच्या कुटुंबीयांनी तिला अनेक वेळा अंकितसोबत संबंध तोडण्याचा इशारा दिला होता, मात्र तिने ऐकलं नाही. हत्येच्या दिवशी शहजादी आई-वडिलांवर चिडून घराबाहेर पडली. याच रागातून तिच्या कुटुंबीयांना अंकितला धडा शिकवायचा निर्णय घेतला.

हत्येच्या दिवशी काय घडलं?

दिल्लीत रघुबीरनगर परिसरात शहजादीची आई स्कूटरवरुन निघाली. तिने जाणूनबुजून अंकितच्या कारला धडक मारली. अंकितला तोपर्यंत ही महिला कोण आहे, याचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे अंकित कारमधून बाहेर निघाला. 'रोड रेज' म्हणजेच अपघाताचं निमित्त करुन शहजादीच्या आईने भांडण उकरुन काढलं.

शहजादीच्या आईच्या मदतीला वडील, काका आणि धाकटा भाऊ आले आणि त्यांनी अंकितला बेदम मारहाण केली. अंकित आपण निर्दोष असल्याचं ओरडत होता, मात्र इतरांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली.

अंकितची आई जवळच राहत असल्यामुळे ती मुलाच्या मदतीला आली, मात्र शहजादीच्या कुटुंबाने तिच्यावरही हल्ला केला. अंकितच्या मानेवर सुरा चालवला गेला. अखेर आईसमोरच अंकितने तडफडून प्राण सोडला.

पोलिसांनी याप्रकरणी शहजादीची आई, वडील, काका आणि अल्पवयीन भावाला अटक केली आहे.

अंकित सक्सेना दिल्लीत फोटोग्राफर होता. त्याचं यूट्यूबवर चॅनलही होतं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे त्याचे अनेक मित्र होते. सर्वांनी अंकितच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी फेसबुकवर मोहीम सुरु केली आहे.