Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धक्कादायक घटना घडली आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या एका विमानाची अकासा एअरच्या विमानाशी टक्कर झाली. यामध्ये स्पाईसजेटच्या विमानाच्या उजव्या विंगलेटचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात दोन्ही विमानांचे नुकसान झाले आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची उड्डाणे थांबवण्यात आली.
नेमकं काय घडलं?
स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल 2026 रोजी, दिल्ली विमानतळावर टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या बी 737-700 विमानाचा अपघात झाला. विमानाच्या उजव्या विंगलेटचे नुकसान झाले, तर दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या डाव्या बाजूच्या हॉरिझॉन्टल स्टेबिलायझरचेही नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून, हे स्पाईसजेटचे विमान दिल्ली विमानतळावर जमिनीवर थांबवण्यात आले आहे. अकासा एअरच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, की, दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या अकासा एअरच्या QP-1406 या विमानाला बे एरियामध्ये परतावे लागले. बे एरियामध्ये उभे असताना अकासा एअरच्या विमानाची दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी टक्कर झाली. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. एअरलाइनच्या ग्राउंड स्टाफने प्रवाशांना शक्य तितक्या लवकर हैदराबादला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.
घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरु
दोन्ही विमान कंपन्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गेल्या आठवड्यात, कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशाच एका घटनेत, बे एरियामध्ये उभ्या असलेल्या इंडिगोच्या विमानाला एका वाहनाने धडक दिली होती. दिल्ली विमानतळ प्रशासन आणि दोन्ही एअरलाइन्सने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोन्ही विमानांच्या तांत्रिक तपासणीसाठी तज्ज्ञांची टीम बोलावण्यात आली आहे. ही घटना विमानतळावरील ग्राउंड ऑपरेशन्स आणि टॅक्सींग प्रक्रियेदरम्यान घडली असून, त्यामागील कारणे शोधण्यात येत आहेत. कोणतीही जीवितहानी न झाल्याने ही घटना मोठ्या अपघातापासून वाचली, मात्र दोन्ही विमानांना मोठे नुकसान झाल्याने उड्डाण वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.