नवी दिल्ली : जुन्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने दिलेली मुदत आज संपणार आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा आज संध्याकाळपर्यंत बँकेत जमा करता येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर काही शेवटच्या जुन्या नोटा उरल्या असतील तर त्या आजच थेट बँकेत जमा करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

प्रतिज्ञापत्र सादर करुन जुन्या नोटा जमा करा
मात्र ज्यांना कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे नोटा बदलणं जमणार नाही, त्यांना पतिज्ञापत्रासह 31 मार्चपर्यंत रिझर्व बँकेत नोटा बदलता येणार आहेत. पण प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास 50 हजार रुपये किंवा जमा केलेल्या नोटांच्या पाच पट दंड भरावा लागेल.

50 दिवसांची मुदतही आज संपणार
नोटाबंदीमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदतही आज संपणार आहे. बँका आणि एटीएम बाहेरच्या रांगा कमी झाल्या असल्या तरीही रोख रकमेची कमतरता अद्यापही कायम आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.



परिस्थिती पूर्णत: सामान्य नाहीच
बँक आणि एटीएमधून पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. सध्याची परिस्थिती पाहता उद्यापासून सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं वाटत नाही. परवापासून नोकरदारांचा पगार जमा होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे काढण्यासाठी पुन्हा अडचणी येऊ शकतात.



जुन्या नोटा बाळगल्यास दंड, जेल नाही
जुन्या नोटांसंदर्भात अध्यादेश 31 डिसेंबरपासूनच लागू होत आहे. नोटा बँकेत भरण्याची मुदत संपल्यावर लगेचच दुसऱ्या दिवसापासून 500 आणि 1000 च्या 10  जुन्या नोटा बाळगल्यास दंड होणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या अध्यादेशात नाही. तसंच कमीत कमी दंड हा 10 हजार रुपये असणार आहे. आता हा अध्यादेश राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पोहोचला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल.