भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत करत विजय मिळवला. दतियाचे काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द झाल्यानं या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत विजय मिळवत काँग्रेसनं बाजी मारली आहे. राजेंद्र भारती यांनी मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव करत विजय मिळवलेला. मात्र, एका गुन्ह्यात 3 वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची आमदारकी गेली होती.  

Continues below advertisement

काँग्रेसच्या विजयाची, तर भाजपच्या पराभवाची कारणं

नरोत्तम मिश्रांना उमेदवारी नाकारणं

भाजपनं सहा वेळा आमदार राहिलेल्या आणि माजी गृहमंत्री असणाऱ्या नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी नाकारली होती. यामुळं त्यांचे समर्थक नाराज झाले होते. पक्षाच्या निर्णयानंतर पक्षात विरोध दिसून आला होता. नरोत्तम मिश्रा यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला मात्र  त्याचा फायदा झाला नाही. 

भाजप पक्ष संघटनेत असंतोष

राजकीय जाणकारांच्या अंदाजनुसार नरोत्तम मिश्रांना उमेदवारी नाकारली गेल्यानं भाजपच्या स्थानिक पक्ष संघटनेत असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. बुथवरील कार्यकर्ते देखील नाराज झाले होते. त्याचा मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या सक्रिय राहण्यावर परिणाम झाला असू शकतो. 

Continues below advertisement

काँग्रेसचा स्थानिक मुद्यांवर प्रचार

काँग्रेसनं या निवडणुकीत मोठ्या राजकीय मुद्यांऐवजी स्थानिक समस्यांना प्राधान्य दिलं. काँग्रेसकडून शेतकऱ्यांचे प्रश्न, अवकाळी पाऊस, खतांची उपलब्धता, बेरोजगारी या मुद्यांना वारंवार मांडलं. या मुद्यांचा ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव दिसून आला, त्याचा काँग्रेसला फायदा झाला.   

महिला मतदार आणि ग्रामीण भागाची भूमिका

राज्य सरकारनं राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा परिणाम महिला मतदारांवर दिसेल, असा अंदाज भाजपचा होता. मात्र,  महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमी राहिली. काही विश्लेषकांच्या मते भाजपला महिला मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणं मिळाला नाही. शहरी भागाच्या तुनलेत ग्रामीण भागात मतदान जास्त झालं. ग्रामीण भागातील मतदानाचा फायदा काँग्रेसला झाला कारण त्यांचा प्रचार शेतकऱ्यांशी संबंधित मुद्यांवर होता.  

काँग्रेसचा पारंपरिक मतदार एकवटला

निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये देखील मतभेद पाहायला मिळाले होते. माजी आमदार राजेंद्र भारती यांना पक्षानं निलंबित केलं होतं. उमेदवारी देण्यावरुन पक्षात वाद होते. मात्र, काँग्रेसचे पारंपरिक मतदार उमेदवारासोबत राहिले आणि त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला. 

दरम्यान,  दतियामध्ये मुख्यमंत्री मोहन यादव, भाजप प्रदेश अध्यक्ष हेमंत खंडेलवाल यांच्याह वरिष्ठ नेत्यांनी प्रचार केला होता.