Cyclone Tej IMD Alert : अरबी समुद्र (Arabian Sea) मध्ये 'तेज' चक्रीवादळ (Tej Cyclone ) तयार झालं असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ आक्राळ-विक्राळ रूप धारण करू शकतं. पुढील 24 तासांत त्याचे आणखी खोल दाबात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाचं वर्णन अतिशय तीव्र चक्रीवादळ असं केलं आहे. हवामान खात्याने यापूर्वी माहिती देताना सांगितलं होतं की, तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तीव्र होईल. आता हे वादळ 22 ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्री वादळात रूपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


तेज चक्रीवादळाचा धोका!


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं असून या चक्रीवादळाला 'तेज' असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातील यंदाच्या वर्षातील दुसरं चक्रीवादळ आहे. अरबी समुद्रात कमी  दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. हवामान विभाग (IMD) च्या मते, तेज चक्रीवादळाचं रविवारी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन ओमान आणि शेजारील येमेनच्या दक्षिण किनार्‍याकडे सरकण्याचा अंदाज आहे.


येमेन-ओमान किनार्‍याकडे वाटचाल


आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्यापूर्वी सोकोत्रा ​​(येमेन) च्या 900 किमी पूर्व-आग्नेय, सलालाह विमानतळाच्या (ओमान) 1,170 किमी आग्नेय आणि अल घायदाह (येमेन) पासून 1,260 किमी पूर्वेस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. सध्या तेज चक्रीवादळ यमनच्या साकोत्रा किनाऱ्यापासून 550 किलोमीटर पूर्व-दक्षिण पूर्वेकडे आहे. स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार, बहुतेक मॉडेल्स सूचित करतात की, वादळ येमेन-ओमान किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे.


चक्रीवादळाचा भारतावर काय परिणाम?


चक्रीवादळामुळे दक्षिणपूर्व आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित झालं आहं. यामुळे भारतीय तटरक्षक दलाने आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना बंदरावर परत जाण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय तटरक्षक दलाने चेन्नई, आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टी भागत अनेक जहाजे तैनात केली आहेत. तसेच मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तेज चक्रीवादळाचा गुजरात किनारपट्टीला सध्या कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.


हवामान विभागाने चक्रीवादळ तेजबाबत संदर्भात धोक्याचा इशारा जारी केला आहे. मच्छिमारांना 25 ऑक्टोबरपर्यंत दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम-मध्य अरबी समुद्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना 25 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत या भागात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या समुद्रात असलेल्या लोकांना तात्काळ किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आलं आहे.