थिरुवनंतरपुरम : केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आज ओखी वादळाने धडक दिली. सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला.
या वादळाच्या दरम्यान अनेक मच्छिमार बेपत्ता झाले असून, तब्बल 218 मच्छिमारांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि नौसेनेला यश आलं.
दरम्यान, पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतल्या 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ निर्माण झाले असून, त्याचा प्रवास आता पश्चिमेच्या दिशेने सुरु झाला आहे.