Petrol Price Today: इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; आता भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली मोठी माहिती
Petrol Price Today: इंधन तेलाबाबत घाबरण्याचे कारण नाही. भारत पुर्णतः हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून नाही, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.

Petrol Price Today: इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर आता युद्ध आणखी तीव्र होण्याची भीती असल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाचा दर आता प्रति बॅरल $80 च्या जवळपास पोहोचला आहे. असे असूनही, भारतातील लोकांना दिलासा मिळाला आहे. कारण, आजही येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. इराणच्या तीन मुख्य आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे तेहरान होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकते अशी चिंता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. इंधन तेलाबाबत घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.
इंधन तेलाबाबत घाबरण्याचे कारण नाही
इंधन तेलाबाबत घाबरण्याचे कारण नाही असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. भारत पुर्णतः हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून नाही. भारतात विविध तेल आयातीचे स्रोत आहेत. सरकार भविष्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटलं की,"पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे, यात हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेचाही समावेश आहे.आम्ही पुरवठ्याचे स्रोत विविध केले आहेत. भारत दररोज 5.5 दशलक्ष बॅरेल खनिज तेलाचा वापर करतो, त्यापैकी सुमारे 1.5 ते 2 दशलक्ष बॅरेल हॉर्मुझ सामुद्रधुनीतून येतात. आम्ही इतर मार्गांद्वारे सुमारे 4 दशलक्ष बॅरेल आयात करतो".
#WATCH | Israel-Iran conflict | Cork, Ireland: Union Minister Hardeep Singh Puri says, "...Insofar as the global situation today is concerned, the escalation of tensions in the Middle East was not entirely unexpected. We had foreshadowed this. The government, under the PM, has… pic.twitter.com/4WeAO6Nljh
— ANI (@ANI) June 23, 2025
" आमच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे. त्यांच्याकडील बहुतांश साठा तीन आठवड्यांपर्यंत आहे. 25 दिवसांचा साठा आहे. आम्ही इतर मार्गांद्वारे तेल पुरवठा वाढवू शकतो. आम्ही सर्व संभाव्य देशांशी संपर्कात आहोत. मला वाटते याबाबत घाबरण्याचे कारण नाही. पंतप्रधानांनी आधीच सर्व प्रमुख नेत्यांशी बोलले आहेत. त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी दीर्घ संभाषण करून तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला आशा आहे, आणि आम्हा सर्वांना अपेक्षा आहे की परिस्थिती शांतता आणि तणाव कमी करण्याकडे जाईल, त्याऐवजी आणखी वाढणार नाही. दरम्यान, आम्ही उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असू”, असंही पुढे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे.
कच्च्या तेलाच्या आघाडीवर भारत चांगल्या स्थितीत
इराणच्या तीन मुख्य आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे तेहरान होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकते अशी चिंता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण तेल आयातीचा मोठा भाग याच सामुद्रधुनीतून होतो. कच्च्या तेलाच्या आघाडीवर भारताची स्थिती अजूनही चांगली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियापासून अमेरिका आणि ब्राझीलपर्यंत, कोणत्याही कमतरतेची भरपाई करण्यासाठी पर्यायी स्रोत सहज उपलब्ध आहेत, असे विश्लेषकांनी सांगितले. रशियन तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वळवले जाते, ते सुएझ कालवा, केप ऑफ गुड होप किंवा पॅसिफिक महासागरातून पोहोचते. दुसरीकडे, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतूनही तेल आयात करता येते, ते थोडे महाग पडू शकते.
भारताचा प्रमुख पुरवठादार कतार, होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करत नाही. ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिकेतील द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) च्या भारतातील इतर स्रोतांवरही याचा परिणाम होणार नाही. विश्लेषकांनी असे म्हटले आहे की पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम नजीकच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतींवर होईल आणि त्यामुळे किमती प्रति बॅरल ८० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात.
रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढली
इराणवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर बाजारपेठेतील अस्थिरतेदरम्यान, भारताने जूनमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की भारतीय रिफायनरी कंपन्या जूनमध्ये रशियाकडून दररोज 20 ते 22 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करत आहेत.हा गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. हा आकडा इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवेत येथून खरेदी केलेल्या एकूण प्रमाणापेक्षाही जास्त आहे. मे महिन्यात रशियाकडून भारताची तेल आयात 19.6 लाख बॅरल प्रतिदिन (BPD) होती. जूनमध्ये अमेरिकेतून तेल आयातही 4,39,000 बॅरल प्रतिदिन झाली. गेल्या महिन्यात हा आकडा 2,80,000 बॅरल प्रतिदिन होता.
























