गोंदिया : व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मिडीया इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने (Crime News) पाहणाऱ्या तरुणीचा तिच्या पतीनेच खून केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. अशरफी ऊर्फ सिया (वय ३३) रा. गोंदिया असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.(Crime News)
इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या दुनियेत रमणाऱ्या गोंदियातील या तरुणीच्या खूनामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशरफी ऊर्फ सिया ही सोशल मीडियावर सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. यावरच तिची ओळख भोपाळच्या समीर नावाच्या तरुणाशी झाली. समीर रिक्षाचालक आहे. त्यांच्यातील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व सिया आपले घर सोडून समीरसोबत राहण्यासाठी भोपाळला गेली. दोघांनी लग्नही केलं. मात्र, समीरची आधीच दोन लग्न झालेली होती.(Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने सियाशी तिसरे लग्न केले होते. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. जेव्हा समीर सियाला घेऊन आपल्या घरी आला, तेव्हा सुरुवातीला त्याने शेजारच्यांना ती आपली मेहुणी असल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचं सत्य समोर आलं. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वादाचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वीच दुसरी पत्नी भांडण करून माहेरी जबलपूरला गेली होती.(Crime News)
पाण्याच्या टाकीत संशयास्पद पेटी अन्...
१२ फेब्रुवारी रोजी परिसरात असलेल्या एका पाण्याच्या टाकीत संशयास्पद परिस्थितीत एक पेटी आढळून आली. पोलिसांनी ही पेटी उघडली असता त्यात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर 'दीप' नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती. या खुणांवरून मृतदेहाची ओळख सिया म्हणून पटली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता संशय पती समीरकडे गेला.
समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण अन्...
तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झाले होते. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घरात असलेली पत्र्याची पेटी काढली. ही तीच पेटी होती जी समीरला त्याच्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळाली होती. त्याच पेटीत त्याने सियाचा मृतदेह कोंबला आणि घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिला. खून केल्यानंतर समीर निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला. सियाचा मृतदेह तीन ते चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून समीरला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे.
