Gold Loan :  सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. खासगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून गोल्ड लोन (Gold Loan) दिले जाते. मात्र, या गोल्ड लोनमध्ये एकाने बँकेलाच दोन कोटींचा जुना लावला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाला या झोलची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईसाठी पावले उचलली आहेत. या सगळ्या प्रकरणात बँकेच्या गोल्ड व्हॅल्यूवरची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. 


काय आहे प्रकरण?


हे प्रकरण राजस्थानमधील (Rajstan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील आहे. बँक ऑफ इंडियातून (Bank Of India) गोल्ड लोनमध्ये (Gold Loan) खोटं सोनं तारण ठेवून तब्बल दोन कोटींचे कर्ज घेतले. हे गोल्ड लोन वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावे देण्यात आले आहे. दरवर्षी बँकेकडून सोन्याचे मूल्यांकन केले जाते. दरवर्षी हा गोल्ड व्हॅल्यूवर सोन्याची तपासणी करून बँकेला माहिती देत असे. हा गोल्ड व्हॅल्यूवर या खोट्या सोन्याला खरं सोनं असल्याचे सांगत लोन अकाउंट अपडेट करायचा. या सगळ्या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापन अंधारात होते. मात्र, गोल्ड लोनच्या नावाखाली झोल सुरू असल्याची कुणकूण बँकेच्या अधिकाऱ्यांना लागली. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनाने चौकशी सुरू केली. 


बँकेकडून चौकशी 


बँकेच्या व्यवस्थापनाला या प्रकरणाची कुणकूण लागल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. या चौकशीत खोटं सोनं तारण ठेवून दोन कोटींचे कर्ज उचलले असल्याची माहिती समोर आली. बँकेच्या व्यवस्थापनाने दुसऱ्या गोल्ड व्हॅल्यूवरला बोलावून या सोन्याची तपासणी केली. त्यावेळी हे खोटं सोनं बँकेला देऊन गोल्ड लोन घेतले असल्याची माहिती समोर आली. जवळपास आठ खात्यांमध्ये खोटं सोनं तारण ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता बँक व्यवस्थापन पुढील कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 


गोल्ड व्हॅल्यूवर संशयाच्या भोवऱ्यात 


या संपूर्ण प्रकरणात सोन्याची किंमत मोजणारा (गोल्ड व्हॅल्यूवर)  घनश्यामची भूमिका संशयास्पद असल्याचे बँक व्यवस्थापनाने सांगितले.  गोल्ड व्हॅल्यूवरने आपल्या नातेवाईकांच्या आणि इतरांच्या नावे बनावट सोने अस्सल असल्याचे सांगून आठ जणांना बँकेकडून दोन कोटींचे कर्ज दिले होते. सध्या बँकेतील इतर खात्यांची चौकशी सुरू असून, तपास पूर्ण होताच सोन्याची किंमत मोजणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही बँकेने सांगितले.


अद्याप पोलीस तक्रार नाही 


हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँक व्यवस्थापनाने  गोल्ड व्हॅल्यूवर घनश्याम याला कामावरून काढून टाकले आहे. त्याच्या जागी दुसरा गोल्ड व्हॅल्यूवर नियुक्त केला आहे. बँकेने अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल केलेला नाही. इतर खात्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच बँक पोलिसांची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.