Rahul Gandhi Wayanad Seat: भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केली आहे. विरोधकांची आघाडी असलेल्या I.N.D.I.A (I.N.D.I.A Alliance) मध्ये अनेक लहान-मोठे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष एकवटले आहेत. यातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे, काँग्रेस (Congress). सर्व विरोधकांची एकजुट करण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेत अनेक मित्रपक्षांना विरोधी आघाडी इंडियाचा भाग बनवलं खंर, पण आता यामुळेच आगामी 2024 लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना वायनाडऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागू शकते, असं बोललं जात आहे


केरळमधील वायनाड म्हणजे, खासदार राहुल गांधींचा मतदारसंघ. 2019 मध्ये राहुल गांधींनी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. पण याच वायनाडची जागा राहुल गांधींना सोडावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे, केरळमधील सत्ताधारी पक्ष सीपीआयनं (भारतीय कम्युनिस्ट पार्टी-सीपीआय) वायनाड मतदारसंघावर दावा करत, आपला उमेदवार उभा करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीचाच एक भाग असलेले सीपीआयचे राज्यसभा खासदार संदेश कुमार पी यांनी नुकत्याच केरळमध्ये झालेल्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत ही मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डाव्या पक्षाचे नेते संदेश कुमार पी यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं की, सीपीआयनं काँग्रेसला राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, विरोधक ज्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत, त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांनी आपसांत भांडण्याऐवजी भाजपला पराभूत करण्यासाठी रणनिती तयार केली पाहिजे, असा सूर ऐकायला मिळत आहे. 


विशेष बाब म्हणजे, केरळमध्ये सीपीआय माकपा (CPIM)  च्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. 2009 मध्ये स्थापन झाल्यापासून हाच पक्ष वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. 


सीपीआय-काँग्रेसचं मत काय? 


पक्षाच्या बैठकीत करण्यात आलेल्या टिप्पणीवर बोलण्यास सीपीआय नेते संदेश कुमार यांनी थेट नकार दिला. बहरहाल पार्टी महासचिव डी राजा यांनी म्हटलं की, बैठकीत आगामी निवडणुकांच्या सामान्य रणनितीवर चर्चा झाली. राज्यांची आपापले अहवाल सादर केले. जागावाटपाबाबत कोणतीच अंतर्गत चर्चा झाली नाही. काँग्रेसचंही हेच म्हणणं आहे की, कोण-कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार? याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. 


आगामी काळात इतर पक्षांकडूनही निर्माण होऊ शकते मागणी 


केरळच्या सीपीआयनं वायनाड जागेबाबत अशी मागणी केली असली तरी, आगामी काळात काँग्रेससमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. कारण इतर राज्यांमध्येही भारत आघाडीत समाविष्ट असलेले अनेक छोटे पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा मागण्या करू शकतात.


विशेष म्हणजे, विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत पक्ष अशीच मागणी करू शकतात, असं बोललं जात आहे. वायनाडमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी 4.31 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.