COVID 19 Nasal Spray : मुंबईतील औषध निर्मिती करणारी कंपनी ग्लेनमार्कने (Glenmark) कॅनडामधील औषध कंपनी ‘सॅनोटाईझ’सोबत मिळून नेझल स्प्रेची (Nasal Spray ) निर्मिती केली आहे. हा स्प्रे नाकात मारल्यानंतर  24 तासांमध्ये कोरोना (Corona) रुग्णामधील व्हायरल लोड 94 टक्के कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. तर 48 तासांमध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव 99 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये या औषधाच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्यातील निकाल प्रकाशित करण्यात आला आहे.  


देशातील कोरोना लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या 306 वयोवृद्ध व्यक्तींवर या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या अँटी-कोविड स्प्रेची चाचणी करण्यात आली आहे. त्यावेळी हा स्प्रे खूपच फायदेशीर असल्याचे दिसून आले. 


मुंबईमधील औषध निर्माण करणारी कंपनी ग्लेनमार्कने नासल स्प्रेची चाचणी केली आहे. या कंपनीने देशातील कोरोनासाठीचा पहिला नेझल स्प्रे लान्च केला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या स्प्रेसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात आली होती. यानंतर आता हा स्प्रे लाँच करण्यात आला आहे.   


चाचणीमध्ये कोरोना रूग्णांच्या नाकात हा स्प्रे मारून सात दिवसांच्या उपचारांचे मूल्यमापन करण्यात आले. या सात दिवसांमध्ये रूग्णाच्या प्रत्येक  नाकपुडीत दोन वेळा हा स्प्रे मारण्यात आला. दररोज सहा वेळा हा स्प्रे रूग्णाच्या नाकात मारण्यात आला. त्यावेळी 24 तासांमध्ये 94 टक्के आणि 48 तासांमध्ये 99 टक्के विणाणूचा नायनाट होत असल्याचे दिसून आले.   


डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या वाढीच्या काळात हा अभ्यास करण्यात आला. संशोधनात असे आढळून आले की NONS प्राप्त करणार्‍या उच्च-जोखीम असलेल्या रूग्णांमध्ये 24 तासांच्या आत व्हायरल लोडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 


“भारतात या स्प्रेची किंमत 25 मिलीच्या बाटलीसाठी 850 रूपये असणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात ही किंमत खूपच कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या आठवड्यापासूनच हा स्प्रे मेडिकलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती  ग्लेनमार्क कंपनीतील क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख आणि सीनिअर व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. मोनिका टंडन यांनी दिली आहे.