Corona Vaccine Price वर्षभरापासून कोरोनाचं संकट साऱ्या जगावर घोंगावत असतानाच आता कुठं जगातील अनेक राष्ट्रांना कोरोना लसीच्या स्वरुपात या विषाणूशी दोन हात करण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतातही अवघ्या काही दिवसांत लसीकरणास सुरुवात होणार आहे. किंबहुना निर्धारित ठिकाणांवर आता लसीचा साठा होण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. देशात कोवॅक्सिन आणि कोविशील्ड अशा दोन लसींच्या आपातकालीन वापराला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. इथं महत्त्वाची बाब अशी, की जगभरातील इतर लसींच्या तुलनेत भारतात लसींचे दर अतिशय कमी ठेवण्यात आले आहेत.


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून कोविशील्डच्या लसीच्या 1.1 कोटी मात्रा आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या 55 लाख मात्र खरेदी करण्यात येत आहेत.


कोवॅक्सिनच्या 38.5 लाख लसींपैकी प्रत्येक लसीवर 295 रुपयांचा कर आकारण्यात येणार आहे. तर, भारत बायोटेक 16.5 लाख लसी मोफत उपलब्ध करुन देणार आहे. तर, कोविशील्डच्या लसीची करासहीतची किंमत 210 रुपये असणार आहे.


इतर कोरोना लसींचे दर किती?


कोरोनाचं संकट घोंगावतानाच जगातील काही राषट्रांमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. भारतातरी लसीकरणाची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा लसीच्या दरांवर खिळल्या आहेत. भारतात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशाच दरांत लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या माहितीनुसार, फायजर बायोएननटेकच्या एका लसीची किंमत 1431 रुपये इतकी आहे. तर, मॉडर्नाच्या लसीची किंमत 2348 रुपयांपासून 2715 रुपयांपर्यंत आहे. नोवावॅक्स लसीचा दर 1114 रुपये आहे, तर स्फूटनिक वी-के लसीची किंमत 734 रुपये इतकी आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची किंमतही 734 रुपयांच्या घरात आहे.
कोरोना लसींच्या दरांसोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या लसींची साठवण. सध्याच्या घडीला फायजरचीच एक अशी लस आहे, जिला सर्वाधिक कमी तापमानात साठवण करुन ठेवणं अपेक्षित आहे. इतर सर्वच लसी 2 ते 8 अंश सेल्शिअसच्या तापमानात साठवल्या जाऊ शकतात. फायजरच्या लसीचा उणे 70 अंश सेल्शिअसपर्यंतच्या तापमानात साठवणं गरजेचं आहे.



सीरमची लस मुंबईत दाखल


सीरमची कोविशील्ड लस मुंबईत दाखल झाली आहे. पहाटे साडेपाच वाजता लसीचा पहिला साठा मुंबईत पोहोचला आहे. मुंबईला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून 1 लाख 39 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईत कोविशील्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईत केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.