COVID-19 Pandemic in India: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये सोमवारी दूरध्वनीवरून संपर्क साधत अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या असणारं कोरोना संकट आणि सध्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या मार्गांवर चर्चा झाली. जवळपास अर्धा तास ही चर्चा झाली. यामध्ये कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीसाठीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही भारत आग्रही दिसला. 


बायडन आणि मोदी यांच्या झालेल्या या चर्चेमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी भारतात सुरु असणाऱ्या प्रयत्नांवरही चर्चा झाली. यामध्ये लसीकरण, औषधं आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली जाण्याचा मुद्दाही प्रकाशझोतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अमेरिकेकडून देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. 


सदर चर्चेनंतर व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून अमेरिका भारतातील कोविड प्रभावित रुग्णांच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचं सांगण्यात आलं. संकटकाळात मदत म्हणून अमेरिकेकडून भारताला ऑक्सिजन उपकरणं, लसीसाठी लागणारी सामग्री आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. 










दरम्यान, यापूर्वी भारताचे NSA अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरताना दिसली. कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने केली तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिलं होतं. ट्विट करत खुद्द जो बायडन यांनी कोरोना संकटात भारताला मदतीचा हात देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्वीट केलं आहे की, "महामारीच्या सुरुवातीला जेव्हा आमच्या रुग्णालयांवर मोठा दबाव होता, त्यावेळी भारताने अमेरिकेला ज्या प्रकारची मदत केली होती, त्याच प्रकारे भारताला संकटसमयी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."