Coronavirus Updates Home Isolation : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. कोरोनाबाधितांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. टेस्ट पॉजिटिव्ह आल्यावर सलग तीन दिवस ताप नसेल तर फक्त सात दिवसाचं होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य करण्यात आले होते. 


होम आयसोलेशनच्या नव्या सूचना तातडीने लागू करण्यासाठी राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातून होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांच्या संपर्कात रहावे. होम आयसोलेशनमधील एखाद्या रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्यास त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास त्याच्यासाठी रुग्णवाहिकेपासून ते रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध करता येऊ शकेल. 


यामुळे होम आयसोलेशनचा सुधारीत नियम?


देशभरात कोरोना संसर्गाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन आणि त्याआधीच्या डेल्टा व्हेरियंटचा फार मोठा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला नव्हता. तर, भारताला डेल्टा व्हेरियंटचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता ओमायक्रॉन व्हेरियंटबाबतही सरकारकडून खबरदारी बाळगली जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतात  अनेक नागरिकांना इतर गंभीर आजारांनीही ग्रासले आहेत. 


आतापर्यंत 4 लाख 82 हजार 551 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 रुग्ण ठिक झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2135 रुग्ण समोर आले आहेत.