Coronavirus In India JN.1 updates : भारतातील कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 फैलावत (Coronavirus Varient JN.1) असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची 22 प्रकरणे होती, त्यांची संख्या आता 110 वर पोहचली आहे. कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित केरळ मध्ये आढळला होता. पण सध्या गुजरात आणि कर्नाटकात याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. बुधवार, 27 डिसेंबरपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, JN1 चे एकूण 110 रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये या दोन राज्यांमधून सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारही याबाबत सतर्क झाले आहे. राजधानी दिल्लीतही JN.1 व्हेरिएंटच्या पहिल्या बाधिताची नोंद करण्यात आली आहे.
या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक बाधित
27 डिसेंबरपर्यंत भारतात कोरोना JN1 च्या या नवीन स्वरूपाची 110 प्रकरणे समोर आली आहेत. पण केरळऐवजी गुजरात आणि कर्नाटकात त्याची प्रकरणे सर्वाधिक आहेत. आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी दिल्लीत JN.1 चा पहिला रुग्ण आढळून आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 27 डिसेंबरपर्यंत गुजरातमध्ये 36 आणि कर्नाटकात 34 रुग्ण आढळले आहेत. यानंतर गोवा, महाराष्ट्र, केरळ आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो.
कोणत्या राज्यात JN.1 ची किती प्रकरणे?
| राज्य | JN.1 व्हेरिएंट किती बाधित? |
| गुजरात | 36 |
| कर्नाटक | 34 |
| गोवा | 14 |
| महाराष्ट्र | 9 |
| केरळ | 6 |
| राजस्थान | 4 |
| तामिळनाडू | 4 |
| तेलंगणा | 2 |
बुधवारी किती कोविड बाधितांची नोंद?
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविडचे 529 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 4,093 आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे कर्नाटकात दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला सांगू द्या की, थंडी आणि कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपामुळे अलीकडच्या काळात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत.
घाबरू नका, काळजी घ्या
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यासोबतच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. सुट्ट्यांमुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे घेतलेल्या निष्काळजीपणामुळे चिंत वाढली आहे. पार्ट्या आणि गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
JN.1 व्हेरिएंट काय आहे?
JN.1 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आढळून आला. हा ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2.86 ने तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला BA.2.86 व्हेरिएंट कोरोनाबाधितांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरला होता. BA.2.86 व्यापकपणे फैलावला नव्हता. मात्र, तज्ज्ञांनी या व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली होती. BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनवर अतिरिक्त म्युटेशन झाले होते. त्याच प्रकारे JN.1 स्पाइक प्रोटीनवरही एक अतिरिक्त म्युटेशन आहे.
जागतिक स्तरावर केसेसमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की JN.1 – Omicron चे उप-प्रकार – मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएस मध्ये सर्वात वेगाने फैलावणारा व्हेरिएंट म्हटले आहे.