Coronavirus Cases Today : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचं दिसत आहे. मागील 24 तासांत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 15 हजार 786 नवी कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 231 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृताची संख्या 4 लाख 53 हजार 42 झाली आहे. गुरुवारी देशात 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाराचा आकडा पार केला.  


देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्यामध्येही मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या एक लाख 75 हजार 745 उपचाराधीन रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 18 हजार 641 जणांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत तीन कोटी 35 लाख 14 हजार 449 लोकांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी 41 लाख 43 हजार 236 इतकी झाली आहे.


देशातील कोरोनाची स्थिती –


एकूण लसीकरण - 100.59 कोटी


मागील 24 तासांतील रुग्ण 15,786  


देशाचा रिकव्हरी रेट  - 98.16           


24 तासात कोरोनामुक्त झालेले18,641


एकूण कोरोनामुक्त  3,35,14,449


उपचाराधीन रुग्ण - 1,75,745  


आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट -  1.31%


दररोजचा पॉझिटिव्हिटी - 1.19% 






महाराष्ट्राची स्थिती काय आहे?


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यात आज 1 हजार 573 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 30 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 24 हजार 292 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.


पश्चिम बंगालनं चिंता वाढवली, 24 तासांत 833 नव्या रुग्णांची भर


मागील 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये नव्या 833 रुग्णांची भर पडली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील एकूण कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 646 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 19 हजार 21 इतकी झाली आहे. दुर्गा पूजा (Durga Puja) उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. पश्चिम बंगालचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. सध्या पश्चिम बंगलचा पॉझिटिव्हिटी रेट 2.52 इतका झाला आहे. राज्यात मागील 24 तासांत 775 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 753 इतकी झाली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 15.57 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.