Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्ग मागील काही दिवसांपासून वेगवान होताना दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 12 हजार 899 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार सध्या एकूण 72 हजार 474 सक्रिय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर 8 हजार 518 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. आदल्या दिवशी 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे.






आठवड्याभरात संक्रमणात 72 टक्क्यांची वाढ
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.


लवकरच येणार नेझल कोरोना वॅक्सिन
देशासह जगभरात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र अद्याप कोरोनावरील पूर्ण उपचार सापडलेला नाही. आता लवकरच कोरोनाची नेझल वॅक्सिन (Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार आहे. भारत बायोटेकचे (Bharat Biotech) अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नेझल वॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात कंपनी नेझल वॅक्सिनची माहिती भारतीय औषध नियामक मंडळाकडे (DGCI) सादर करेल.