Coronavirus Cases Today in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात काल 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनाबाधित आणि मृत्यू या दोन्हींच्य संख्येत तुलनेनं घट झाल्याचं दिसून येतंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत 332 रुग्णांची घट झाली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर
देशात सध्या 28 हजारांहून अधिक कोरोना उपचाराधीन रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 28 हजार 814 वर पोहोचला आहे. सध्या देशात 28 हजार 79 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशातील कोरोना दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.65 टक्के आहे, तर आठवड्याचा सकारात्मकता दर 1.27 टक्के आहे.
देशात 218 कोटी लसीचे डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. देशात आतापर्यंत 218 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशात 91 हजार 458 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 89.71 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहे.