Coronavirus Cases Today in India : अलिकडे देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशात तब्बल 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 7,591 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी 09 जून रोजी 7,584 रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांची संख्या आठ हजारांच्या खाली गेली आहे. शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी 7 हजार 591 रुग्ण आढळले. कोरोना रुग्णसंख्येत 1 हजार 845 रुग्णांची घट झाली आहे.


गेल्या 24 तासांत 41 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.




राज्यात कोरोनाचा आलेख घसरला


महाराष्ट्रात रविवारी 1639 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर रविवारी दिवसभरात एकूण 1698 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,36, 576 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 814 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,18,661 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,688 झाली आहे. सध्या मुंबईत 4,969 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 610 रुग्णांमध्ये 570 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1042 दिवसांवर गेला आहे.