नवी दिल्ली : सध्याच्या घडीला देशभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक लाखोच्या संख्येनं कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच आता ही रुग्णसंख्या वाढ सर्व स्तरांवर दहशतीचं वातावरण निर्माण करु लागली आहे. देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता एक बैठक घेणार आहे. या बैठकीत सर्व मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहे. 


देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार शुक्रवारी देशात 2.34 लाख कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1341 लोकांचा मृत्यू  झाला आहे. आतापर्यंत 1, 23, 354 जण कोरोनातून बरे झाले आहे. 


देशातील आजची कोरोनाची स्थिती



  • एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 45 लाख 26 हजार 609

  • कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 26 लाख 71 हजार 220

  • सध्याचे सक्रिय रुग्ण : 16 लाख 79 हजार 740

  • एकूण मृत्यू : 1 लाख 75 हजार 649

  • एकूण लसीकरण : 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 


AIIMS चे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरुवात झाल्यानंतर कोरोनाचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा केला आहे. ज्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 


देशातील कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमागे डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना असल्याचा दावा आता करण्यात येतोय. गेल्या आठवड्यात भारतीय वैज्ञानिकांनी जीनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटा जमा केला होता. त्यामध्ये 24 टक्के नव्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डबल म्युटेशनचा स्ट्रेन सापडला असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रात देण्यात आली होती.  डबल म्युटेशन कोरोना स्ट्रेन हा महाराष्ट्रातील अनेक रुग्णांमध्ये सापडल्याची माहिती आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात सापडलेला डबल म्युटेशन स्ट्रेनचा कोरोना हा बी.1.617 लिनीज स्ट्रेन असल्याचं सांगण्यात येतंय.