लखनौ : देवबंद विद्यापीठात मुस्लिम विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचं काम सुरु असल्याचा धक्कादायक दावा माजी भाजप नेते आणि मुस्लिम अभ्यासक आरिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. देवबंद विद्यापीठाच्या वादग्रस्त पुस्तकात  जिहाद या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.  कुराणात सांगण्यात आलेला जिहाद संकल्पनेचा पाक अर्थ बाजूला ठेवून, दहशतवादाला खतपाणी घालणारा नापाक अर्थ शिकवला जातोय, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि मुस्लिम अभ्यासक आरिफ मोहम्मद खान यांनी केला आहे.

भाजपचे माजी नेते आणि मुस्लिम अभ्यासक आरिफ मोहम्मद खान यांचा हा दावा खळबळ उडवून देणारा आहे. कारण अशिया खंडातल्या सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशच्या देवबंद विद्यापीठात जिहादचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला आहे.  ज्यांना इस्लाम मान्य नाही त्यांच्या विरोधात जंग करा असा अर्थ या विद्यापीठात शिकवला जातोय असा त्यांचा दावा आहे.

देवबंदच्या अभ्यासक्रमात अशरफुल हिदाया नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकात जिहादचा भयंकर अर्थ शिकवला जात असल्याचा खान यांचा दावा आहे. ज्यांना इस्लाम मान्य नाही, त्यांच्याविरोधात जंग छेडण्याची शिकवण दिली जाते, असा दावा आहे. पुस्तकातल्या या उताऱ्याची भाषा अत्यंत स्फोटक अशी आहे. गेली अनेक वर्षे हे पुस्तक देवबंदच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. देशोदेशीची मुलं जिहादचा चुकीचा अर्थ शिकत आहेत. हे पुस्तक देवबंदच्या थानवी प्रेसमध्ये छापलं गेलंय

देवबंद विद्यापीठातल्या पुस्तकावर आरिफ मोहम्मद खान यांनी ओढलेले आसूड गंभीर आहेत. इतक्या प्रतिष्ठित विद्यापीठावर असे आरोप होत असल्यानं त्या पुस्तकातल्या मजकुराची तपासणी एबीपी माझाने केली असता त्यात तथ्य आढळून आले. लातूरच्या मुस्लिम अभ्यासक आणि मौलवींना याबाबत विचारलं असता त्यांनी मान्य केलं की या पुस्तकात जिहादचा चुकीचा अर्थ शिकवला जात आहे.

हे पुस्तक जमील अहमद सिकरोडवी आणि मौलाना मोहम्मद अहमतुल्ला यांनी लिहिलं आहे. पण देवबंदमध्ये शिकलेल्या मौलवींच्या मते हे पुस्तक फक्त देवबंद गावातून प्रकाशित झालं आहे. त्याचा देवबंद विद्यापीठाशी संबंध नाही. पण आरिफ मोहम्मद खान यांना मात्र हे मान्य नाही. अर्थात विद्यापीठाकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आरिप मोहम्मद खान यांचा दावा खरा असेल, तर ती मोठ्या चिंतेची गोष्ट आहे. कारण प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे.
कोण आहेत आरिफ मोहम्मद खान
40 वर्षे राजकारणात असलेल्या आरिफ मोहम्मद खान 13 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विधानाचा आधार घेऊन काँग्रेसवर चढवलेल्या हल्ल्यानंतर ते प्रकाशात आले.

देवबंद विद्यापीठाबाबत
देवबंद हे उत्तरप्रदेशातल्या सहारनपूरमधलं एक गाव आहे.
1866 साली दार-उल-उलून ही मुस्लिम अभ्यासकांची संस्था सुरु झाली.
इजिप्तच्या मुस्लिम विद्यापीठानंतर देवबंदला मोठा दर्जा आहे.
देशविदेशातले विद्यार्थी इथं मुस्लिम धर्म, तत्वज्ञानाचे धडे घेतात