नवी दिल्ली : काँग्रेसचं वृत्तपत्र नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या वृत्तामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राफेल डीलवरून मोदी सरकारवर प्रश्न उभे करण्यासाठी छापलेल्या बातमीमुळे काँग्रेसच गोत्यात आली आहे. काँग्रेसच्या वृत्तपत्रातील हेडलाईनमध्ये 'राफेल : मोदीज् बोफोर्स' असं लिहिलं आहे.


नॅशनल हेरॉल्डच्या हेडिंगनंतर काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे. नॅशनल हेरॉल्डच्या या बातमीमुळे बोफोर्स घोटाळा झाल्याचं काँग्रेसने मान्य केलं काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


शहजाद पुनावाला यांनी वृत्तपत्राची हेडलाईन ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने सर्व चहावाले आणि गरिबांवर टीका केली. नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसने लष्कर आणि देशावर टीका केली. आज काँग्रेसने मोदींवर टीका करण्याच्या नादात गांधी घराण्यावरच हल्ला केला आहे. नरेंद्र मोदींवर टीका करता करता काँग्रेस आपलं डोकं हरवून बसणार आहे."





हेडलाईनमध्ये बोफोर्सचा उल्लेख
नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या बातमीत बोफोर्सचा उल्लेख केवळ हेडलाईनमध्ये आहे. राफेल सरकारची डोकेदुखी असल्याचं यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बातमीत कुठेही राफेल आणि बोफोर्सची तुलना करण्यात आलेली नाही.


राफेल डीलमध्ये घोटाळ्याचा आरोप
राफेल डीलवरुन काँग्रेस सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहे. राफेल डीलवरून राहुल गांधी यांनी अनेकदा नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. अविश्वास ठरावादरम्यानच्या चर्चेत राहुल गांधी यांनी राफेल डीलवरून नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.


काय आहे बोफोर्स घोटाळा?
भारत सरकारने 1986मध्ये स्वीडिश कंपनी बोफोर्सकडून 1437 कोटी खर्च करून 400 तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल 1987मध्ये स्वीडिश रेडिओने दावा केला की बोफोर्समध्ये अनेक भारतीय नेते आणि अधिकाऱ्यांना मध्यस्थीसाठी मोठी रक्कम देण्यात आली. मात्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या आरोपांचा दावा खोडून काढला होता. या घोटाळ्यामुळे भारतीय राजकारणात मोठे बदल त्यावेळी पाहायला मिळाले होते.