नवी दिल्ली : संसदेच्या मान्सून अधिवेशनादरम्यान (Monsoon Session) लोकसभेत आपली पूर्ण ताकद दाखवण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी, 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हिप (Three-line Whip) जारी करून सभागृहात उपस्थित राहण्याचे अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी संसदेत महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा होणार असून त्यासाठी उपस्थित राहावे, असा आदेश काँग्रेसने त्यांच्या खासदारांना दिला आहे.
दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही (NDA) आपल्या सर्व खासदारांना सोमवार, 10 ऑगस्टपासून राजधानी दिल्लीतच हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Congress Three-Line Whip : 'सभागृह स्थगित होईपर्यंत उपस्थित राहा'
लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे (CPP) मुख्य व्हिप (Chief Whip) कोडिकुन्निल सुरेश यांनी शुक्रवारी हा थ्री-लाईन व्हिप जारी केला. त्यानुसार, 10, 11 आणि 12 ऑगस्ट (सोमवार ते बुधवार) या तीन दिवसांत सर्व खासदारांनी सकाळी 11 वाजल्यापासून सभागृहाचे कामकाज स्थगित होईपर्यंत अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
या तीन दिवसांत लोकसभेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयांवर चर्चा होणार असून, पक्षाची अधिकृत भूमिका ठामपणे मांडण्याचे निर्देश खासदारांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदारांची अनुपस्थिती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे.
Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत येणार?
काँग्रेस आणि भाजपने त्यांच्या खासदारांना कोणत्याही परिस्थितीत दिल्ली सोडू नये, असे आदेश दिले आहे. त्यामागे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे कारण असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या अर्थसंकल्पात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपला अपयश आलं होतं. आता आकड्यांची जुळवाजुळव करण्यात भाजपला यश आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचसोबत, FCRA (Foreign Contribution Regulation Act) सुधारणा हे विधेयकही सत्ताधाऱ्यांकडून मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर सविस्तर चर्चा घडवून आणणे आणि ते दोन्ही सभागृहांतून मंजूर करून घेण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.
ही बातमी वाचा:
