मुंबई : काँग्रेसनं (Congress) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे पण या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (chhatrapati shivaji maharaj) केल्याचा आरोप भाजपने केलाय. काँग्रेसनं ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतलाय. व्हिडिओ तातडीनं डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवाय काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी असंही भाजपनं म्हंटलंय. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी, अशी माागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे आणि तातडीने काँग्रेसने माफी मागितली पाहिजे जर व्हिडिओ डिलीट केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असेही बावनकुळे म्हणाले.
राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. काँग्रेसनं ट्वीट केलेल्या या व्हिडीओवर भाजपने संताप व्यक्त केला आहे. तर राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा भाजप गप्प का होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.
भाजपचा खरा चेहरा जनतेला माहित आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्याचे काय झाले? गोव्यात, महाराष्ट्रात गोमातेबद्दल काय भूमिका आहे याचे उत्तर भाजपने आधी द्यावे. भाजपला महापुरुषांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. भाजप फक्त मतांसाठी वापर करते. भाजपचा खरा चेहरा जनतेला माहिती आहे. त्यावर त्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही नाना पटोले म्हणाले.
हे ही वाचा :