नवी दिल्ली : विजय दिवसाच्या Vijay Diwas 2020 निमित्तानं शुभेच्छा देत असतानाच कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गांधी यांनी ट्विट करत संपूर्ण देशाला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळीच त्यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांनाच टोला लगावला.


देशात शेजारी राष्ट्रांकडून होणारी घुसखोरी आणि त्यामुळं उदभवलेली तणावाची परिस्थिती या साऱ्याचा संदर्भ देत गांधी यांनी पंतप्रधानांना टोला लगावला. ‘ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा भारताचे शेजारी राष्ट्र पंतप्रधानांना कणखर समजत होते आणि आपल्या देशाची सीमा ओलांडण्यासही घाबरत होते’, असं राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं.


1971 मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्यामुळं राजकीय वर्तुळात यासंबंधीच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. या ट्विटमध्ये पंतप्रधानांचं नाव घेण्य़ात आलं नसलं तरीही शब्दांचा कल कोणत्या दिशेनं आहे याचा अनेकांनीच अंदाज घेतल्याचं कळत आहे.





का साजरा केला जातो विजय दिवस?


पूर्व पाकिस्तान म्हणजेच आज बांग्लादेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा या राष्ट्राची पाकिस्तानच्या जाचातून सुटका करण्यासाठी बांग्ला मुक्ती वाहिनीचा संघर्ष सुरु होता. भारतीय लष्कर सुरुवातीच्या काळाज या संघर्षाचा भाग नसतानाही पाकिस्तानच्या सैन्यानं भारताविरोधात 'ऑपरेशन चंगेज खान' सुरु करत भारतीय सीमेवर जवळपास १४ दिवसांसाठी हा संघर्ष चालला ज्यामध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानला नमवलं. पुढं पूर्व पाकिस्तान वेगळं होऊन स्वतंत्र बांगलादेशचा जन्म झाला. हाच दिवस भारतात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.