मुंबई: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीची ऐतिहासिक निवडणूक पार पडली असून तब्बल 24 वर्षानंतर आता काँग्रेसला गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि खासदार शशी थरुर अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांच्यासह 50 मतदारांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कँपमधून मतदान केलं. देशातून एकूण 9900 मतदारांपैकी 9500 मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला असून महाराष्ट्रातून एकूण 561 पैकी 547 मतदान झालं झालं. बुधवारी, 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याचा निकाल लागणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण 561 पैकी 547 मतदारांनी मतदान केलं.
अध्यक्षपदासाठी 96 टक्के मतदान
आजच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी मतदान केलं.
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी केलं मतदान
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेमध्ये असून त्यांनी बेल्लारीच्या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी यांच्यासोबत इतर 50 मतदारांनी या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
अध्यक्षपदासाठी मतदानाला सकाळी 10 वाजता सुरूवात झाली. दिल्लीतील मुख्यालयात सर्वप्रथम पी चिदंबरम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश, अजय माकन, मुकुल वासनिक, अंबिका सोनी आणि इतर नेत्यांनी मतदान केलं.
सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका
काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत आहेत. अध्यक्षपदाच्या मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.